घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी उद्या वाळू सत्याग्रह नदीकाठी, सरपंच संघटनाही सरसावली लाभार्थ्यांच्या न्यायासाठी
प्रशांत चंदनखेडे वणी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू न देता त्यांना वेठीस आणून त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला जात असल्याने या अन्यायाविरुद्ध माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्त्वात १५ मे ला सकाळी ११ वाजता पासून वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. वणी शिरपूर मार्गावरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ नदी पात्रात हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणी तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी हे वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात घरकुल लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रविण झाडे यांनी केले आहे.
वणी तालुक्यात प्रशासन आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात प्रशासनाचा शिस्तबद्धपणाच पाहायला मिळत नाही. येथे अधिकारी व कर्मचारी मनमर्जी कामे करतांना दिसतात. कुणाचा कुणावरच वचक राहिल्याचे दिसत नाही. प्रशासनाच्या बेजाबदारपणामुळे सर्वसामान्य जनता कमालीची वेठीस आली आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही. तस्कर मात्र शासनाच्या महसुलावर मस्त डल्ला मारत आहेत. रेती तस्करांना येथे सुगीचे दिवस आले आहेत. अनेक दिवसांपासून रेती तस्करी सुरु असल्याची ओरड होऊन आता घसे कोरडे पडायला लागले आहेत, पण रेती तस्करीला मात्र पायबंद घालण्यात प्रशासनाला यश आले नाही. रेती तस्कर व त्यांचे पाठीराखे पैशात खेळत आहेत. तर सर्वसामान्य जनता रेतीसाठी टाहो फोडत आहे. पण आंधळ्या व बहिऱ्या प्रशासनाला त्यांच्या वेदना कळत नाही. कारण प्रशासन संवेदनाहीन झालं आहे.
रेती तस्करीच्या विरोधात अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी महसूल विभागाला निवेदने दिली. पण रेती तस्करीवर मात्र रोख लागला नाही. रात्री चालणारे रेती तस्करीचे खेळ दिवसाही रंगू लागले. मात्र थातुर मातुर कारवाया करून महसूल विभाग आपली पाठ थोपटून घेत राहिला. आणि रेतीसाठी याचना करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांकडे महसूल विभाग पाठ फिरवीत आहे. रेतीसाठी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून घरकुल लाभार्थ्यांच्या चपला झिजल्या, पण पाषाणव्ह्रदयी प्रशासनाला मात्र पाझर फुटला नाही.
गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला. पण रेती अभावी त्यांना हक्काचा निवारा बांधता आला नाही. घरकुलाचा लाभ मिळाल्याने अनेकांनी आपली पडकी घरे खोलली. पण रेती न मिळाल्याने ते पक्की घरे बंधू शकले नाहीत. आता पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी रेतीसाठी टाहो फोडू लागले आहेत. घरकुल मिळाले, पण प्रशासनाने रेती उपलब्ध करून न दिल्याने घराचे बांधकाम हाती घेतलॆल्या लाभार्थ्यांवर आता उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाविरोधात विजय पिदूरकर यांनी दंड थोपटले आहेत.
विजय पिदूरकर यांनी थेट वाळू सत्याग्रहाची हाक दिली असून घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याकरिता त्यांनी निर्गुडा नदी पात्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही, हा निर्धार करून विजय पिदूरकर वाळू सत्याग्रह करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने देखील पाठिंबा दर्शविला असून संघटनेकडून शिरपूर येथील महादेव मंदिरापासून तर निर्गुडा नदी पात्रापर्यंत न्याय दिंडी काढण्यात येणार आहे. घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर व सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रविण झाडे यांनी केले आहे.
No comments: