Latest News

Latest News
Loading...

रेती जमा करण्यास सांगितल्याने झाला वाद, एकाने दुसऱ्याचे फोडले डोके


प्रशांत चंदनखेडे वणी 

शुल्लक कारणावरून वाद घालत एकाने दुसऱ्याला फावड्याच्या दांड्याने मारून डोके फोडल्याची घटना तालुक्यातील पळसोनी येथे १६ मे ला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 

पळसोनी येथे वास्तव्यास असलेल्या पुरुषोत्तम बंडू झट्टे (२६) याच्याकडे दोन मालवाहू पिकअप आहे. त्यापैकी एक पिकअप तो स्वतः चालवितो. त्याच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्याने गावाबाहेर मोकळ्या जागेत रेतीचा साठा करून ठेवला होता. परंतु रेती जमिनीवर पसरू लागल्याने त्याने गावातीलच आशिष रामा नावडे (२३) याला रेती एका ठिकाणी जमा करून रेतीचा व्यवस्थित ढीग करून देण्यास सांगितले. त्यासाठी त्याला त्याची मजुरीही देण्याचे पुरुषोत्तमने कबुल केले. आधी आशिष नावडे याने रोजंदारीने रेती जमा करून देण्यास होकार दिला. पण पुरुषोत्तमने १६ मे ला रात्री ८.३० वाजता जेंव्हा त्याला रेती जमा करण्यास सांगितले तेंव्हा तो पुरुषोत्तमवरच भडकला. 

रेती नाही जमा करत अशी अरेरावीची भाषा करीत त्याने पुरुषोत्तमलाच शिवीगाळ करणे सुरु केले. पुरुषोत्तमने शिवीगाळ कशाला करतो असे म्हणताच त्याने सरळ पुरुषोत्तमला फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. फावड्याचा दांडा पुरुषोत्तमच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने पुरुषोत्तम जखमी झाला. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्याच्या मित्राने पुरुषोत्तमला उपचाराकरिता रुग्णालयात आणले. पुरुषोत्तमवर उपचार करून ते दोघेही घराकडे परतत असतांना आशिष नावडे याने परत त्यांना रस्त्यात गाठून दोघांनाही लाथाबुक्क्याने मारहाण केली.

आशिष नावडे हा दारूचा व्यसनी असून तो नेहमी गावात दादागिरी करतो. यातूनच त्याने पुरुषोत्तमशी वाद घालून त्याला मारहाण करून जखमी केले. तसेच त्याला आणखी एखाद्या दिवशी तुला मारतो अशी धमकी दिली. त्यामुळे पुरुषोत्तमने आशिष नावडे याच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पुरुषोत्तमच्या तक्रारी वरून पोलिसांनी आशिष रामा नावडे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.