प्रशांत चंदनखेडे वणी
रेती तस्कर प्रचंड निर्ढावले असून प्रशासनालाही ते आव्हान देऊ लागले आहेत. प्रशासनाला न जुमानता रेती घाटावरून रेतीची तस्करी करू लागले आहेत. रेती तस्करांकडून बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक केली जात आहे. रेती तस्करांना कार्यवाहीची जराही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. रेती तस्करांच्या दबंगगिरीचा केळापूर प्रशासनाला चांगलाच अनुभव आला. रेती तस्करांची दबंगगिरी अधिकाऱ्यांना प्रत्येक्षात पाहायला मिळाली. झरीजामणी तालुक्यातील टाकळी रेती घाटावरून वाळू चोरी करणाऱ्या तस्करांनी उपविभागीय अधिकारी व नायब तहसीलदारांशीच हुज्जत घालून रेती भरलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. रेती तस्करांनी उपविभागीय अधिकारी व नायब तहसीलदारांशी अरेरावी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्याविरुद्ध मंडळ अधिकारी यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी एकूण ६ रेती तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ मे ला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
झरीजामणी तालुक्यातील टाकळी रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने केळापूरचे उपविभागीय अधिकारी अमित रंजन व नायब तहसीलदार किशोर सयाम हे टाकळी रेती घाटाची तपासणी करण्याकरिता आले. तेथे त्यांना एक रेती भरलेला विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने अधिकाऱ्यांशी अरेरावी करीत रेती भरलेला ट्रॅक्टर दामटत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षक व वाहन चालकाने ट्रॅक्टर पकडला. पण ट्रॅक्टर चालकाने त्यांना हुलकावणी देत ट्रॅक्टर सुसाट पळवून नेला. तेवढ्यात अधिकाऱ्यांना दुसरा रेती भरलेला ट्रॅक्टर रेती घाटावरून येतांना दिसला. अधिकाऱ्यांनी त्याही ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅक्टर चालकाने अधिकाऱ्यांच्याच अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला. आणि ट्रॅक्टर सुसाट पळवून नेला.
काही वेळानंतर हे दोन्ही ट्रॅक्टर चालक दुचाकीने रेती घाटावर आले. त्यांच्याच मागे त्यांचे अन्य चार साथीदारही आले. या सर्वांनी अधिकाऱ्यांशी अरेरावी करीत रेती घाटावर एका तस्कराची असलेली गाडी जबरदस्ती तेथून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात टाकळी गावचे सरपंच, पोलिस पाटील व पोलिसांचा ताफा रेती घाटावर पोहचल्याने या सर्व तस्करांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी रेती घाटावरून दोन्ही तस्करांच्या मोटारसायकल जप्त केल्या. अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याइतपत तस्करांच्या हिंमती वाढल्याने येथे वाळू माफियाराज आल्याचे दिसून येत आहे. तस्करांनी अधिकाऱ्यांशी अरेरावी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करून कायद्याच्या अंमलबजावणीस बाधा आणल्याने पाटणबोरीचे मंडळ अधिकारी मारोती कुळसंगे यांच्या तक्रारी वरून मंचला राजू, गोपाल बायकर, बबन कोलेकर, प्रकाश बायकर, गणेश धोत्रे, अर्जुन कोलेकर सर्व रा. पाटणबोरी ता. केळापूर या सहाही रेती तस्करांवर पाटण पोलिस स्टेशनमध्ये बीएनएसच्या कलम १२१, १३२, ३(५), ३०३, ३०४ व अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे.
No comments: