प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र शासनाकडून १०० दिवसांचा कार्यालयीन मूल्यमापन कृती आराखडा सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्वच विभागीय स्तरावर देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांनी १०० दिवसांच्या कामकाजाचे तुलनात्मक व कृतिशील आराखडे सादर केले. या मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद आणि जनतेला वेळेवर सेवा पुरविणे याचे मूल्यांकन करून शासकीय कार्यालयांना त्यांचे उल्लेखनीय कामकाज व योग्यतेनुसार क्रमांक देण्यात आले. यात वणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने राबविलेली १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम सर्वोत्कृष्ठ ठरली. एसडीपीओ कार्यालयाचे १०० दिवसातील कामकाज अतुलनीय व सरस ठरल्याने शासनाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अमरावती विभागातून वणी एसडीपीओ कार्यालय अव्वल ठरले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापनात केलेली आमूलाग्र सुधारणा आणि गुन्हे शोध प्रणालीत आधुनिक तंत्र प्रणालीचा केलेला वापर यामुळे गुन्हेगारी प्रतिबंधक कारवायांना योग्य दिशा मिळाली. एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी आपल्या विशेष कार्यप्रणालीतून गुन्हेगारीवर निर्बंध व अनेक क्लिष्ट गुन्हांचाही छडा लावला आहे. आणि त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीमुळे वणी एसडीपीओ कार्यालय अमरावती उपविभागातून अव्वल ठरलं आहे.
राज्य शासनाने क्षेत्रीय कार्यालयांना १०० दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार वणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने राबविलेली १०० दिवसांची कार्यालयीन कामकाज सुधारणा मोहीम अत्यंत प्रभावी ठरली. या कालावधीत एसडीपीओ कार्यालयाने गुन्हे तपास, नागरी सेवा, कार्यालयीन स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम व गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये प्रगती साधली. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत एसडीपीओ कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेत कार्यालयीन कामकाजात धोरणात्मक बदल घडवून आणले. कार्यालयीन व्यवस्थापन सुशासित केले. या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने कायदा सुव्यवस्था, नागरी सेवा, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन शिस्तबद्ध करण्यावर विशेष भर दिला.
याचेच फलित म्हणून वणी पोलिस कर्तव्यात अलर्ट झाले. पोलिस विभागात सुसूत्रता आली. फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत ११२ वरील फोन कॉलवर पोलिस यंत्रणा अवघ्या ६ मिनिटात घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी अलर्ट राहून ११२ वरील ५१७ फोन कॉल योग्यरित्या हाताळले. वणी पोलिस स्टेशनने ११२ वरील फोन कॉलला सर्वाधिक प्रतिसाद दिला. गुन्ह्यातील एकूण मुद्देमालापैकी ५७.१४ टक्के मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने वितरित केला. गुन्ह्यांचा छडा, गुन्हेगारांचा शोध व गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्याकरिता सीसीटीव्ही तंत्र प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला. १ हजार ४४१ गुन्ह्यांपैकी १ हजार २०५ गुन्हे उघडकीस आणून त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. डिजिटल कार्यालय, क्यूआर कोडद्वारे मुद्देमाल ट्रॅकिंग ही डिजिटल प्रणाली अवंलबतांनाच स्वच्छता, सौंदर्यीकरण, वृक्षरोपण, पोलिसांसाठी व्हॉलीबॉल मैदान, जिम अशी उल्लेखनीय कामगिरी करण्यात आल्याने वणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय शासनाच्या मूल्यमापन मोहिमेत अव्वल ठरले आहे.
वणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यलायाला अव्वल स्थानाचा मान मिळवून देण्याचं श्रेय्य जातं ते एसडीपीओ गणेश किंद्रे आणि उपविभागातील सर्व पोलिस स्टेशनचे ठाणेदार, दुय्यम अधिकारी तथा एसडीपीओ कार्यालयाचे पीएसआय अरुण नाकतोडे, इकबाल शेख, विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, प्रदीप ठाकरे, संतोष कालवेलवार, उमा करलूके, वैशाली गाडेकर, अतुल पायघन, अशोक दरेकर या सर्वांना.
No comments: