Latest News

Latest News
Loading...

स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने रखडली महत्वपूर्ण कामे, प्रशासनाने लक्ष घालण्याची होत आहे मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरात स्टॅम्प पेपरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शहरवासीयांना स्टॅम्प पेपर खरेदी करण्याकरिता आसपासच्या तालुक्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या बेजाबदारपणामुळे तथा मुद्रांक विक्रेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शहरवासीयांवर स्टॅम्प पेपरसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय व्यवस्थेत कुणाचंच कुणावर नियंत्रण राहिल्याचं दिसत नाही. स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यामुळे मागील दोन ते तीन दिवस नागरिकांना स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. मुद्रांक विक्रेत्यांकडे मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. तसेच स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना ज्यादा दारानेही स्टॅम्प पेपर खरेदी करावे लागल्याची चर्चा ऐकायला मिळाली. स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. 

शासकीय कार्यालय वगळता अन्य प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते. स्टॅम्प पेपरावरच ही प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतात. शासकीय व खाजगी बँकांमधून कर्जाची उचल करण्याकरिता स्टॅम्प पेपरवरच हमीपत्र लिहून द्यावं लागतं. पण १०० व २०० रुपयांचे स्टॅम्पच बाजारात उपलब्ध नसल्याने कर्ज घेणाऱ्यांची चांगलीच फजित होत आहे. तसेच हक्कसोड प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, मालमत्ता खरेदी विक्री करार, व इतर शासकीय दस्तऐवजांसाठी स्टॅम्प पेपरची नितांत आवश्यकता भासते. नुकतेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षांचे निकाल लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही काही आवश्यक प्रमाणपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासत आहे. मात्र त्यांनाही आता स्टॅम्प पेपरसाठी वणवण भटकावे लागत आहे. 

स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यामुळे अनेक महत्वाची कामे रखडली आहेत. खरेदी विक्रीच्या व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. अनेक शासकीय व कायदेशीर दस्तऐवजांची कामे अडली आहेत. स्टॅम्प पेपरच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यात येत नसल्याने नागरिकांना स्टॅम्प पेपरच्या टंचाईला सामोरे जावे लागते. मुद्रांक विक्रेते म्हणतात रेव्हेन्यू विभागाने स्टॅम्प पेपरच्या वितरण व व्यवस्थापनाची जबाबदारी व स्टॅम्प पेपरच्या पुरवठ्याकडे लक्ष न दिल्याने स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ते सरळ हात वर करीत आहेत. मात्र अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना ज्यादा दराने स्टॅम्प पेपर खरेदी करावे लागल्याचेही सांगण्यात येत आहे. तर काही नागरिकांना आपली महत्वाची कामे लांबणीवर जाऊ नये म्हणून आसपासच्या तालुक्यात स्टॅम्प पेपरसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून स्टॅम्प पेपरच्या तुटवड्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.