प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून एका पाठोपाठ होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरीही नैराश्येतून आत्महत्या करू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. वणी तालुक्यातील कायर येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ मे ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बंडू विठ्ठल गुरनुले (४५) असे या गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कायर येथे परिवारासह राहत असलेल्या बंडू गुरनुले या युवा शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. बंडू गुरनुले शेती वाहून कुटुंबाचा गाडा हाकायचे. मात्र सोमवारी अचानक त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना चांगलाच धक्का बसला. कुटुंबं धायमोकलून रडू लागलं. कुटुंबियांना दुःख अनावर झालं. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने असा हा आत्महत्येचा मार्ग निवडल्याने कुटुंबावर दुःखाचा कोसळला आहे. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिमसंकराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. बंडू गुरनुले या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. बंडू गुरनुले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. युवा शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: