पाच दिवसांत मिळणार घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाचे पास, वाळू सत्याग्रह आंदोलनाने प्रशासनाला आली जाग
प्रशांत चंदनखेडे वणी
प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळूनही त्यांना रेती अभावी घरकुलाचे बांधकाम करता न आल्याने घरकुल लाभार्थ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात बुधवार १५ मे ला थेट निर्गुडा नदी पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या आनोदालनाने प्रशासन खडबडून जागं झालं. घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही, हा आक्रमक पवित्रा विजय पिदूरकर यांनी घेतल्याने प्रशासनाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. दरम्यान तहसीलदारांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन घरकुल लाभार्थ्यांना ५ दिवसांत रेती उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्र दिले. आणि आंदोलन मागे घेण्यास सांगितले. येत्या ५ दिवसांत घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे पास वाटप करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीनेही जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला होता.
शासनाच्या विविध योजनेत पात्र ठरलेल्या गोरगरीब जनतेला शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहे. घरकुल मंजूर झाल्याने हक्काचे पक्के घर बांधण्याची सर्वांनाच आतुरता लागली. घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती देण्याचे शासनाचे आदेश देखील आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरविण्याचे शासनाचे आदेश असतांना प्रशासन मात्र घरकुल लाभार्थ्यांना वेठीस आणत होतं. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे लाभार्थी कमालीचे त्रस्त झाले होते. रेतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवून लाभार्थ्यांच्या नाकी नऊ आले. रेतीसाठी टाहो फोडताना अखेर पावसाळा तोंडावर आला. पण प्रशासनाला मात्र पाझर फुटला नाही. घरकुलासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांनी पक्के घर बांधण्याच्या आशेपोटी पडकी घरे खोलली. मात्र त्यांना वाळूच उपलब्ध करून देण्यात न आल्याने अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही.
शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात काळ्या बाजारातून रेती विकत घेऊन घरकुल बांधणं लाभार्थ्यांसाठी शक्य नसल्याने ते महसूल प्रशासनाकडून रेती मिळण्याची चातकासारखी वाट बघत होते. पायाला भिंगरी बांधल्यागत ते महसूल कार्यालयाच्या चकरा मारत होते. पण महसूल विभाग त्यांच्यावर दयादृष्टी दाखवायला तयार नव्हता. घरकुलाचा लाभ मिळाल्याने पक्के घर बांधण्याकरिता अनेक लाभार्थ्यांनी पडकी घरे खोलली. परंतु घरकुल बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने त्यांच्यावर उघड्यावर संसार करण्याची वेळ आली होती. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने त्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या व्यथा व व प्रशासनाकडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे विजय पिदूरकर यांनी प्रशासना विरोधात दंड थोपटून वाळू सत्याग्रह करण्याचा निर्धार केला.
बुधवार १५ मे ला चारगाव चौकी-शिरपूर मार्गावरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ नदी पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विजय पिदूरकर यांच्या वाळू सत्याग्रह आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागं झालं. तहसीलदार निखिल धुळधर यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तसेच येत्या ५ कार्यालयीन दिवसांत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन करून त्यांना पास वाटप करण्याचे लिखित पत्र विजय पिदूरकर यांना दिले. विजय पिदूरकर यांच्या निवेदनाचा संदर्भ देऊन जिल्हा प्रशासनाने १४ मे ला व्हीसी (VC) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार वणी तालुक्यातील घरकुलांना ४३२० ब्रास रेती देण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याचेही तहसिलदारांकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना येत्या ५ दिवसांत रेती उपलब्ध करून देण्याच्या लिखित पत्रामुळे माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वातील वाळू सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आले.
No comments: