Latest News

Latest News
Loading...

ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच पतसंस्था प्रगतीपथावर पोहचली, ऍड. देविदास काळे

प्रशांत चंदनखेडे वणी 

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाबरोबरच सभासदांचाही सिंहाचा वाटा आहे. सभासद हा पतसंस्थेचा अविभाज्य घटक आहे. त्यातच ग्राहकांनी दाखविलेली विश्वासाहर्ताही पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आधार बनली आहे. पतसंस्थेने उत्तरारोत्तर केलेली प्रगती ही पतसंस्थेशी जुळलेल्या प्रत्येकाच्याच योगदानाचं फलित आहे. आज रंगनाथ स्वामी पतसंस्था ही यशाच्या शिखरावर पोहचली ती संचालक मंडळाची प्रामाणिकता व सभासदांच्या विश्वासाचं प्रमाण आहे. आज श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या २२ शाखा आहेत. ८७ हजार ७५ एवढे सभासद आहेत. पतसंस्थेत ८१८ कोटी ९६ लाखांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने ४७० कोटींचे कर्जवाटप केले आहे. आणि २ कोटी ९७ लाखांचा पतसंस्थेला नफा झाला आहे. 

ग्राहकांचा विश्वास ही पतसंस्था कधीच तडीस जाऊ देणार नाही. ग्राहकांना आणखी उत्तम सेवा व सुविधा कशा पुरवता येतील, याकडे या पतसंस्थेचा कटाक्ष राहील. सभासद हा या पतसंस्थेच्या प्रगतीचा धागा आहे. तेंव्हा सभासदांनी कर्जफेढ करण्यास प्राथमिकता दिली पाहिजे. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे व्यवहार व कार्य पारदर्शक असून पतसंस्थेच्या धेय्य धोरणांवर चालण्याचं काम संचालक मंडळाचं आहे. कारण सभासद व ग्राहकांचा विश्वासच पतसंस्थेची पुंजी आहे, असे मनोगत श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांनी व्यक्त केले. ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त वरोरा येथे आयोजित सभासद मेळाव्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते. 

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणीच्या वरोरा शाखेतर्फे वरोरा येथील स्व. दादासाहेब देवतळे सभागृहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित सभासद मेळावा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. देविदास काळे हे होते. तर उद्घाटक म्हणून सहकार प्रशिक्षण केंद्र अकोलाचे माजी उप प्राचार्य प्रा. कवडूजी नगराळे हे उपस्थित होते. तसेच श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे, वरोरा शाखेचे संचालक परीक्षित एकरे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ व्यासपीठावर विराजमान होतं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विवेकानंद मांडवकर यांनी केलं. यावेळी उप प्राचार्य कवडूजी नगराळे यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. परीक्षित एकरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 

या मेळाव्यात पतसंस्थचे उत्कृष्ठ ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी व उत्कृष्ठ अभिकर्ता तसेच पतसंस्थेच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं संचालन पायल परांडे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक सुरेश बरडे यांनी केलं. मेळाव्याला परिसरातील नागरिक, सभासद व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयीन संचालक मंडळासह वरोरा शाखेचे व्यवस्थापक विलास बोबडे, कार्यालयीन कर्मचारी व अभिकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. 

No comments:

Powered by Blogger.