Latest News

Latest News
Loading...

अठरा वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करीत लुटली अब्रू, अनोळखी नराधमाचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

प्रशांत चंदनखेडे वणी 

अनोळखी इसमाने शहरातील एका अठरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना १ मे ला दुपारी १२ ते २ वाजता दरम्यान गांधी नगर परिसरातील गॅस गोडावून मागे तळ्याजवळ घडली. मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितल्यानंतर आई  वडिलांनी मुलीला सोबत घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाविरुद्ध मुलीने स्वतः पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

गांधीनगर परिसरात असलेल्या वीट भट्ट्यातील विटांचे तुकडे जमा करण्याकरिता ही मुलगी घरून जात असतांना निर्जनस्थळी एका अनोळखी इसमाने तिला मागून करकचून पकडले. एवढेच नाही तर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत बाजूला असलेल्या तळ्याजवळ खेचत नेले. तसेच तिचे कपडे फाडून तिला काटेरी झुडपात नेत तिच्यावर बळजबरी केली. या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करतांनाच अनैसर्गिक कृत्य देखील केले. अनोळखी इसमाने बेदम मारहाण करीत बळजबरी व अनैसर्गिक अत्याचार केल्याने मुलगी प्रचंड हादरली. तिने घरी येऊन आपल्या आईला आपबिती सांगितली. तिच्या सोबत घडलेली घटना ऐकून आईच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आईने लगेच मुलीच्या वडिलांना फोन करून मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगितले. हे ऐकून वडील तात्काळ घरी आले, व मुलीला सोबत घेऊन आई वडिलांनी सरळ पोलिस स्टेशन गाठले.

मुलीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. भरदुपारी एका अठरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याइतपत नराधमांच्या हिमती वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. वणी सारख्या शांतताप्रिय व सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात दिवसाढवळ्या एका मुलीची अब्रू लुटल्या गेल्याने महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. मुलीला बेदम मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि धनंजय रत्नपारखी करीत आहे.   

No comments:

Powered by Blogger.