विदर्भ राज्य हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही घेणारच, १ मे काळा दिवस पाळून विदर्भवाद्यांचं निषेध आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळण्यात आला. समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात निषेध आंदोलन करतांनाच वणी येथेही विदर्भवाद्यांनी निषेध आंदोलन करून विदर्भ राज्य झालंच पाहिजे अशा जोरजोरात घोषणा दिल्या. विदर्भ राज्याची गर्जना करीत परिसर दणाणून सोडला. या निषेध आंदोलनात रखरखत्या उन्हातही मोठ्या संख्येने विदर्भवाद्यांनी सहभाग नोंदविला होता.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वणी, झरी व मारेगाव तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र दिनी निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस पाळून विदर्भवाद्यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विदर्भ राज्य निर्मितीचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं हे सरकार आता आपल्या आश्वासनापासून मुकरलं आहे. विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याकडे पाठ फिरवत आहे. परंतु विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भाला राज्याचा दर्जा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देता की जाता या भूमिकेतून सरकारला वेळोवेळी अल्टिमेटम देणारी विदर्भ राज्य आंदोलन समिती आता आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता शक्य नाही. विदर्भातील खनिज संपत्तीची केवळ लूट केली जात आहे. विदर्भाच्या खनिज संपत्तीतून विदर्भाव्यतेरिक्त संपूर्ण महाराष्ट्राचा विकास साधला जात आहे. मात्र विदर्भाला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे.
विदर्भात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. विदर्भातील तरुण रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहे. रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध होतांना दिसत नाही. अवाजवी विद्युत दर लादुनही अघोषित भारनियमनाचं भूत मानगूट सोडायला तयार नाही. विदर्भ कर्जात बुडाला आहे. सिंचनाचा अनुशेष ६० कोटींच्याही वर गेला आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युतीकरण, आदिवासी ग्राम विकास, समाज कल्याण या क्षेत्राचा अनुशेष तर १५ हजार कोटींच्याही वर गेला आहे. परिणामी सुशिक्षित तरुण बेरोजगारीच्या वणव्यात भरडत आहे. तर शेतकरी मृत्यूचं दार ठोठावतो आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकास व प्रगती करीता आता वेगळं विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी केला आहे.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी वेळोवेळी तीव्र आंदोलनं करून केंद्र व राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे हा काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भात निषेध आंदोलन केलं. त्यानुषंगाने वणी येथेही विदर्भवाद्यांनी निषेध आंदोलन करून विदर्भ राज्याच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता विदर्भवादी मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रा.पुरूषोत्तम पाटील यांचेसह रफिकभाई रंगरेज, विदर्भ सचिव अँड.राहुल खारकर, प्रा.बाळासाहेब राजुरकर, नामदेवराव जेनेकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, बालाजी काकडे ,अनील गोवारदिपे, संजय चिंचोलकर, होमदेव कनाके, देवा बोबडे, व्हि.बि.टोंगे, पुंडलिक पथाडे, मोरेश्वर वासेकर, गणपतराव पिंपळशेंडे. प्रकाश नागतुरे, अजय धोबे, प्रा.अनिल टोंगे, भाऊ आसुटकर, अशोक चौधरी, रामजी महाकुलकर, गजेंद्र भोयर, भारत जेऊरकर, लक्ष्मण इदे, सुरेश राजुरकर, भाऊराव लखमापुरे, प्रभाकर मोहितकर, प्रभाकर उईके, आनंदराव पाणघाटे, अक्षय कवरासे, धिरज भोयर, आशिष रिंगोले, सुजित गाताडे, नितीन तुराणकर, अमित उपाध्ये, पुंडलिक जुनघरी, गजानन खाडे यांच्यासह अनेक विदर्भप्रेमी नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
No comments: