प्रशांत चंदनखेडे वणी
चोरटे चोरी करण्यात कमालीचे पटाईत झाले असून विविध शक्कली लढवून ते चोरीचे डाव साधू लागले आहेत. एका शिक्षकाला तुमचे पैसे खाली पडले असल्याचा बनाव करून चक्क मोटारसायकलच्या डिक्कीतून दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. चोरट्याने थोडेफार पैसे खाली टाकून शिक्षकाला दोन लाखांचा गंडा घातला. खिशातून न पडलेले पैसे उचलण्याच्या नादात शिक्षक चोरट्याच्या गळाला लागला. आणि दोन लाख रुपये गमावून बसला.
चोरीच्या वेगवेगळया तऱ्हा लढवून चोरटे नागरिकांच्या मुद्देमालावर हातसाफ करू लागले आहेत. शासकीय व प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या माध्यमांनी जनजागृती करूनही नागरिक सतर्कता बाळगायला तयार नसल्याने चोरटे त्यांच्या मुद्देमालावर डल्ला मारू लागले आहेत. चोरीचे धडे गिरवणाऱ्या एका चोरट्याने शिक्षकाचीच फिरकी घेत दुचाकीच्या डिक्कीतून अलगद दोन लाख रुपये उडविल्याने शिक्षकावर पश्चातापाची वेळ आली आली आहे. चोरट्याने जमिनीवर पैसे पडल्याचा बनाव करून दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केल्याची तक्रार शिक्षकाने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे.
शहरातील विद्यानगरी येथे वास्तव्यास असलेले दिलीप ज्ञानोबाजी नारनवरे हे तालुक्यातील निवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांचं वणी चिखलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेत बचत खातं आहे. त्यांनी गुरुवार दि. २२ मे ला बँक खात्यातून २ लाख रुपये विड्रॉल केले. ती रक्कम त्यांनी दुचाकीच्या लेदरच्या डिक्कीत ठेवली. मात्र त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने त्यांना गंडविण्याची शक्कल लढविली. त्याने शिक्षकाच्या शेजारी जमिनीवर काही पैसे टाकले. आणि शिक्षकाला तुमचे पैसे पडले असल्याचा बनाव करून दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रक्कम उडविली.
चोरट्याने डिक्कीतील २ लाख रुपये चोरून पोबारा केल्यानंतर शिक्षकाला चोरट्याची हुशारी लक्षात आली. शिक्षक जेंव्हा दुचाकी जवळ आले तेव्हा त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली. डिक्कीतील २ लाख रुपयांची रक्कमही त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. चोरट्याने त्यांना गंडा घातल्याचे नंतर त्यांना कळून चुकले. चोरट्याने आपलाच क्लास घेतल्याचे शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना चांगलाच पश्चाताप झाला.
चोरट्याने नियोजितपणे गंडा घातल्याने २ लाख रुपयांची रक्कम गमावून बसलेल्या शिक्षकाने सरळ पोलिस स्टेशनला धाव घेत आपबिती कथन केली. पैसे खाली पडल्याचा बनाव करून चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख रुपये लंपास केल्याची तक्रार शिक्षकाने पोलिस स्टेशनला नोंदविली. दिलीप नारनवरे या शिक्षकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी चोरट्यावर बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शहरात चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून विविध शक्कली लढवून ते नागरिकांचा मुद्देमाल लंपास करू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या मुद्देमालाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. लग्न सोहळे, धार्मिक स्थळ, बसस्थानक व बँक परिसरातही चोरट्यांचा वावर वाढला असून सामान्य नागरिकांप्रमाणे वावरणारे हे चोरटे अलगद नागरिकांच्या मुद्देमालावर हात साफ करू लागले आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: