Latest News

Latest News
Loading...

पाऊस होता पडत पण देशभक्ती होती अंगात सळसळत, सैनिकांच्या सन्मानार्थ शहरात निघाली भव्य तिरंगा यात्रा

प्रशांत चंदनखेडे वणी 

अतिरेक्यांनी पहलगाम येथील पर्यटकांवर गोळ्या चालवून २६ निष्पाप जीवांचे बळी घेतले. त्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तान हद्दीतील अतिरेकी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र डागली. पाकिस्तानच्या आश्रयात वसलेले दहशतवादी तळ सैन्याने उद्धवस्त केले. दहशतवादी कारवायांवर जोरदार प्रहार करतांना भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ गुरुवार २२ मे ला सायंकाळी शहारत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढविण्याकरीता व पाकिस्तानातील दहशवादी तळ उध्वस्त केल्याबद्दल सैनिकांचे आभार मानण्याकरिता ही तिरंगा यात्रा काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून तिरंगा यात्रेला सुरवात झाली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातील प्रमुख मार्गाने ही तिरंगा यात्रा निघाली. तिरंगा यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही तिरंगा यात्रा लक्ष वेधणारी होती. एका आकर्षक सजावट केलेल्या रथात भारतमातेची वेशभूषा साकारण्यात आली होती. भारत माता की जय च्या नाऱ्यांनी आसमंत निनादला होता. तिरंगा यात्रेतील जयघोषांनी आसमंतही गरजला आणि तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्रभक्तांवर वर्षा वृष्टी केली. भर पावसातही नागरिकांचा जोश आणि राष्ट्रभक्तीचा गजर पाहायला मिळाला. यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांच्याच हातात तिरंगा झेंडा लहरत होता. 

शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत ही तिरंगा यात्रा परत शिवतीर्थ येथे पोहचल्यानंतर या तिरंगा यात्रेचा समारोप झाला. त्यानंतर टिळक चौक येथे सन्मान सभा घेण्यात आली. यावेळी देशाच्या सैनिकांप्रती अभिमान व्यक्त करण्यात आला. दहशतवादाचा बिमोड करण्याकरिता भारतीय लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या दैदिप्यमान यशाचा यावेळी गौरव करण्यात आला, व सैनिकांचे आभार मानण्यात आले. तसेच सेनेत कार्यरत असलेल्या कुटुंबीयांचा साडीचोळी व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरवासीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Powered by Blogger.