प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका अल्पवयीन मुलीला सिनेस्टाइल पद्धतीने पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या आहे. अनिकेत नांदे वय अंदाजे २० वर्ष रा. खडबडा मोहल्ला असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा तर घेतला नसावा, याबाबतही त्याची कसून चौकशी केली जात आहे.
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेने तिच्या १४ वर्षीय मुलीला खडबडा मोहल्ला येथील अनिकेत नांदे याने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार २० मे ला पोलिस स्टेशनला नोंदविली. ही मुलगी नागपूर येथे आपल्या आजीकडे राहून येथेच शिक्षण घेत होती. मात्र शाळेला सुट्ट्या लागल्याने ती वणी येथे आपल्या आई वडिलांकडे आली होती. याच काळात आरोपी तरुणाने अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेले. आरोपीची हिंमत बघता कुटुंबियही प्रचंड धास्तीत आले. मुलीला पळवून नेतांना आरोपीला मुलीचा मामा समोर दिसताच त्याने सरळ त्याच्या अंगावरच कार चढविण्याचा प्रयत्न केला. नंतर काही अंतरावर कार थांबवून त्याने मुलीला पळवून नेले. तरुणाने मामाच्या डोळ्यासमोर मुलीला पळवून नेल्याने घाबरलेल्या मुलीच्या आईने सरळ पोलिस स्टेशन गाठून तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शीघ्र हालचाली सुरु केल्या. वेगवान तपासचक्रे फिरवून व खबऱ्यांकडून माहिती मिळवून अवघ्या काही तासांतच अल्पवयीन मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला हुडकून काढले.
पोलिसांनी आरोपीला गुरुवार २२ मे ला सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून ताब्यात घेऊन वणी पोलिस स्टेशनला आणले. अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. तर तिला पळवून नेणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. आरोपी तरुणाने तिच्या अजाणतेपणाचा फायदा तर घेतला नसावा, याची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याचे तपासात समोर आल्यास गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस शिपाई सचिन मरकाम यांनी केली.
No comments: