प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका तरुणीवर अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा आरोपी मुलीवर अत्याचार झाल्याच्या दिवसापासून बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत असतांनाच आज ८ मे ला तो मानकी शेत शिवारात दडून बसला असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून शहरातील खडबडा मोहल्ला येथे तो राहतो. तरुणी ही दुपारी विटांचे तुकडे वेचण्याकरिता घरून निघाल्यानंतर वागदरा शिवारातील तलावाजवळ आरोपीने तिला मागून करकचून पकडले. तसेच तिला बेदम मारहाण करीत तिचे कपडे फाडून तिला काटेरी झुडपात ओढत नेत तिच्यावर बळजबरी केली. नराधमाने केलेल्या अत्याचारामुळे मुलगी प्रचंड हादरली. तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी तिला सोबत घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. मुलीने घडलेली घटना पोलिसांसमोर कथन केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. दिवसाढवळ्या ही लाजिरवाणी व गंभीर घटना घडल्याने पोलिसांवर आरोपीचा शोध लावण्याकरिता प्रचंड दबाव वाढला होता. पोलिस युद्ध पातळीवर आरोपीचा शोध घेत असतांनाच ७ दिवसानंतर हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
शहरात वास्तव्यास असलेली ही मुलगी गांधीनगर परिसरात असलेल्या वीट भट्ट्यावर विटांचे तुकडे वेचण्याकरिता घरून जात असतांना अट्टल गुन्हेगार असलेल्या कटरची वासनांध नजर या १८ वर्षाच्या मुलीवर पडली. निर्जनस्थळी एकटी मुलगी डोळ्यासमोर दिसताच तो वासनेने पिसाळला. या हैवानाची वासनांध प्रवृत्ती जागली आणि त्याने कुठलाही विचार न करता या बेसावध मुलीला मागून करकचून पकडले. तिला बेदम मारहाण करीत तिचे कपडे फाडले. तिला काटेरी झुडपात ओढत नेत तिच्यावर अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार केला. महाराष्ट्र दिनी ही घटना घडल्याने शहरवासियांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत होता. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेप्रतीही नागरिकांमधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अशातच आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही आरोपीचा शोध लावण्याकरिता पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलिसांनी आपली सर्व खबरी यंत्रणा कामाला लावली. पोलिसही आरोपीचा युद्ध पातळीवर शोध घेत होते.
अशातच खडबडा मोहल्ला येथील अट्टल गुन्हेगार घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मुलीने सांगितलेल्या वर्णनाचाच हा आरोपी असल्याने आणि तो घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मुलीवर लैंगिक अत्याचार करतांना दाडी वाढवून असलेल्या या आरोपीने नंतर वागदरा येथे जाऊन दाडी काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर आणखीच संशय बळावला. आरोपीच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पोलिसांनी त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले. शेवटी ७ दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत असलेला कटर पोलिसांच्या हाती लागलाच. संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो मानकी शेत शिवारात दडून बसला होता. पोलिसांची चाहूल लागताच तो सुसाट पळत सुटला. मात्र पोलिस पथकाने त्याचा सिनेस्टाइल पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने व डीबी पथक व पोलिस पथकाने केली.
No comments: