प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव शहरातील एका उच्च शिक्षित तरुणीने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. ८ मे ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दीक्षा केशव उमरे (२७) असे या गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १६ येथे कुटुंबासोबत राहत असलेल्या दीक्षाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून जगाचा निरोप घेतला. दीक्षा ही उच्च शिक्षित तरुणी होती. तिने अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ती औरंगाबाद येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होती. तिच्या लग्नाकरिता स्थळ आल्यानंतर लग्नाची बोलणी होऊन तिचे लग्न देखील जुळले होते. मात्र जुळलेले लग्न काही कारणास्तव तुटल्याने दीक्षा ही मानसिक तणावात होती. अशातच नैराश्येतून तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास लावून जीवनाचा शेवट केला. सकाळी तिच्या खोलीचे दार आतून बंद असल्याने कुटुंबीयांनी दार तोडले. तेंव्हा दीक्षा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दीक्षाच्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र मानसिक विवंचनेतून तिने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. जीवनाच्या यशस्वी वळणावर तिने आत्मघात केल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उच्च शिक्षित तरुणीने असा हा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नैराश्येतून तरुण मुलं मुली आत्महत्या करू लागल्याने पालकवर्ग कमालीचा चिंतेत आला आहे. पोलिस दीक्षाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
No comments: