Latest News

Latest News
Loading...

कारचा काच फोडून केली मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी 

लग्न वरातीमुळे कार पुढे घेणे शक्य नसल्याने कार चालक रस्ता खुला होण्याची वाट बघत असतांनाच मागून येणाऱ्या दुचाकी चालकाने कारचा काच फोडून कार चालकाला कार मधून बाहेर खेचत मारहाण केल्याची घटना ५ मे ला दुपारी १२.३० वाजता सिद्धी विनायक मंगल कार्यालयाजवळ घडली. कार चालकाला थापडा बुक्क्या व दगड मारून जखमी करण्यात आल्याने कार चालकाने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील विनायक नगर येथे राहणारे सुरेश भुवाजी आसुटकर (५७) हे कारने सिद्धी विनायक मंगलकार्यालय येथे लग्नाकरिता गेले होते. मात्र सिद्धी विनायक मंगल कार्यालयाजवळ लग्नाच्या वरतीमुळे रस्त्यावर जाम लागला होता. त्यामुळे त्यांनी पत्नीला तेथेच उतरून ते कारमध्ये बसून रस्ता खुला होण्याची वाट बघत होते. त्याचवेळी गणेशपूर येथे राहणारा शंकर श्रावण थेरे (३६) हा आपल्या पत्नीसह त्याच मार्गाने दुचाकीने जात होता. त्याने वरतीमुळे अडकून पडलेल्या कारचा दगड मारून काच फोडला. एवढेच नाही तर कार चालकाला शिवीगाळ करीत कार मधून बाहेर खेचत थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. शंकर थेरे याने कारला मारलेला दगड सुरेश आसुटकर यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यामुळे सुरेश आसुटकर यांनी कारचा (MH २९ CJ ०४९७) काच फोडून कारचे केलेले ३० हजार रुपयांचे नुकसान व झालेल्या मारहाणी बाबत शंकर थेरे याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी शंकर श्रावण थेरे (३६) ह.मु. गणेशपूर ता. वणी याच्यावर बीएनएसच्या कलम १२५(a), ३२४(४), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार संतोष अढाव करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.