प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञात चोरट्याने हात चलाखी दाखवून एका महिलेच्या पर्स मधील सोन्याची पोत लांबविल्याची घटना शुक्रवार दि. ९ मे ला दुपारी ४.३० ते ४.४५ वाजताच्या सुमारास बसस्थानक येथे घडली. सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात येताच या महिलेने सरळ पोलिस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही तात्काळ बसस्थानकावर येऊन तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र तेथील छोट्या सीसीटीव्ही स्क्रीनवर चोरट्याची हालचाल टिपता न आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिस स्टेशन मधील मोठ्या स्क्रीनवर तपासणी करीता नेले. सोन्याची पोत चोरीला गेल्याने महिला प्रचंड धास्तावली होती. चोरीला गेलेली सोन्याची पोत ही अंदाजे एक ते सव्वा लाख रुपये किंमतीची असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
बसस्थानक हे चोरट्यांचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड पाहायला मिळत आहे. बसमध्ये चढतांना प्रवाशांची उसळणारी गर्दी चोरट्यांना हातचलाखी दाखविण्याकरिता फायद्याची ठरू लागली आहे. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करू लागले आहेत. नागपूर येथून लग्न समारंभाकरीता आलेल्या शारदा काठोळकर या महिलेची अज्ञात चोरट्याने बसमध्ये चढतांना पर्स मधून सोन्याची पोत लंपास केली. शारदा काठोळकर या महिलेचे शहरातील रंगारीपुरा येथे माहेर आहे. त्यामुळे वणी येथेच नात्यातील लग्न असल्याने माहेरच्या मंडळींच्याही भेटीगाठी होईल या उद्देशाने शारदा व तिची मोठी बहीण शेतकरी मंदिर येथे लग्न सोहळ्याकरिता आल्या होत्या. लग्न सोहळा आटोपल्यानंतर या दोघीही बहिणी परतीच्या प्रवासाला निघाल्या.
मात्र परतीच्या प्रवासात चोरट्यांनी हातचलाखी दाखवून महिलेची सोन्याची पोत लंपास केली. शारदाने गळ्यात घालून असलेली सोन्याची पोत मोठ्या बहिणीने सुचविल्याप्रमाणे गळ्यातून काढून पर्समध्ये ठेवली. मात्र शारदाने पर्समध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेली सोन्याची पोत चोरट्याने अलगद लंपास केली. महिलेला पर्सची चैन खुली दिसल्याने चांगलाच धक्का बसला. तिने पर्स तपासली असता तिला पर्समध्ये सोन्याची पोत आढळून आली नाही. पर्समध्ये ठेवलेली सोन्याची पोत चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात येताच ती प्रचंड घाबरली. ती अश्रू ढाळत धावतच पोलिस स्टेशनला आली. पोलिसांना घडलेली घटना सांगितल्यानंतर पोलिसांनीही तात्काळ बसस्थानक गाठले.
बसस्थानकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. परंतु तेथील छोट्या स्क्रीनवर पोलिसांना चोरट्याच्या हालचाली टिपता आल्या नाही. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिस स्टेशन मधील मोठ्या स्क्रीनवर तपासणी करीता नेले. शहरात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्याने नागरिक कमालीचे चिंतेत आले आहेत. चोरटे वेगवेगळ्या तऱ्हा लढवून चोरी करू लागल्याने नागरिकांच्या किंमती वस्तूंची सुरक्षा धोक्यात आली आहे. लग्न समारंभात पाहुणे बनून तर बसस्थानकावर प्रवासी बनून चोरटे मौल्यवान वस्तूंवर हात साफ करू लागले आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
गर्दीच्या ठिकाणी महिलांनी सावध राहून आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी
लग्न समारंभात महिला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालून येतात. त्यामुळे चोरटे लग्न समारंभात येणाऱ्या महिलांवर पाळत ठेऊन नकळत त्यांचे दागिने लंपास करीत असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. तसेच दागिने घालून प्रवास करणाऱ्या महिलांनाही सतर्क राहणे तेवढेच गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांत लग्न समारंभ, धार्मिक स्थळ व बसस्थानकावरून महिलांचे दागिने चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे महिलांनी दागिने परिधान केल्यानंतर आपल्या दागिन्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. महिला बेसावध राहिल्यास चोरटे सोन्याच्या दागिन्यांवर हातसाफ केल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा आपल्या दागिन्यांची सुरक्षितता ही आपलीही जबाबदारी असली पाहिजे.
No comments: