Latest News

Latest News
Loading...

मेकॅनिकच निघाला चोर, कार मधून साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या मेकॅनिकला पोलिसांनी केले बोलते

प्रशांत चंदनखेडे वणी 

गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता आलेल्या कारच्या ड्रॉवर मधून साडेसात तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या गॅरेज मधील चोरट्या मिस्त्रीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी त्याच्या जवळून जप्त केला आहे. शेख तनवीर शेख अजिज (२०) रा. रंगनाथ नगर असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

तालुक्यातील मोहदा येथील रहिवाशी असलेले रविंद्र रामदास राजूरकर हे माहेरी लग्न समारंभाकरीता गेलेल्या पत्नीला आणण्याकरिता कारने भद्रावतीला जात असतांना त्यांच्या कारचे कुलंट संपल्याने ते कारमध्ये कुलंट टाकण्याकरिता मुकुटबन रोडवरील मिर्झा सर्व्हिसिंग सेंटर येथे कार घेऊन गेले. त्यांच्या कारच्या ड्रॉवरमध्ये सोन्याचे दागिने असलेले पाकिट ठेवले होते. गॅरेज मधील मिस्त्रीने कुलंट टाकल्यानंतर रविंद्र राजूरकर सरळ भद्रावतीला निघून गेले. भद्रावतीला पोहचल्यानंतर त्यांनी कारच्या ड्रॉवर मधील दागिन्यांचे पाकिट काढण्याकरिता ड्रॉवर उघडले. पण ड्रॉवर मधील पाकिटात सोन्याचे दागिनेच नव्हते. त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी पत्नीला घेऊन थेट मिर्जा सर्व्हिसिंग सेंटर गाठले. गॅरेज मालक झाकीर मिर्झा व त्यांचा मेकॅनिक शेख तनवीर शेख अजिज यांना दागिन्यांबद्दल विचारणा केली असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. 

२८ मे ला दुपारी २ वाजता रविंद्र राजूरकर यांनी कार गॅरेजमध्ये आणली आणि त्याच दरम्यान कारच्या ड्रॉवर मधील सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यामुळे गॅरेज मधील मेकॅनिक शेख तनवीर शेख अजीज याला रविंद्र राजूरकर यांनी दागिने परत करण्याची वारंवार विनंती केली. परंतु तो दागिने परत करण्यास साफ नकार देत होता. त्यामुळे त्यांनी ३० मे ला कार मधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. आणि तक्रारीत त्यांनी कारच्या मेकॅनिकवर संशय व्यक्त केला. 

तक्रार दाखल होताच पोलिसांनी मिर्झा गॅरेज मधील कार मिस्त्री शेख तनवीर शेख अजिज याला चौकशी करीता ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र नंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. कार मधील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुल करतांनाच त्याने लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी शेख तनवीर शेख अजिज याच्या जवळून साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने किंमत ७ लाख रुपये असा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी शेख तनवीर शेख अजिज याला अटक करून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

 

No comments:

Powered by Blogger.