प्रशांत चंदनखेडे वणी
विविध सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक शेतकरी मंदिर येथे महिला उद्योजकता मार्गदर्शन शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मंदिर येथेच घेण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात एकूण ८० रक्दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात रक्त संकलनाची जबाबदारी नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बँकेच्या चमूंनी पार पाडली. दरम्यान महिला बचत गट व लघु उद्योजक महिलांसाठी घेण्यात आलेल्या महिला उद्योजकता मार्गदर्शन शिबिराला सुरवात झाली. या शिबिरात महिलांना लघु उद्योग व कर्ज वाटप या संदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मौलिक मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी - बियाण्यांची किट वाटप करण्यात आली. वणी-मारेगाव-झरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप देखील करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट व लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments: