प्रशांत चंदनखेडे वणी
गोवंशाची कत्तल व गोमांस विक्रीवर शासनाने बंदी आणली असतांनाही चोरून लपून गोमांस विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत समोर आले आहे. एका मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून पोलिसांनी १४.५ किलो गोमांस जप्त केले आहे. गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रंगनाथ नगर येथे एक इसम गोमांस विक्री करीत असून त्याच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत गोमांस भरून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तेथे एक इसम दुचाकीसह उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी करतांनाच दुचाकीची डिक्की उघडून बघितली असता त्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत गोमांसाचे तुकडे आढळून आले. एकूण सात पिशव्यांमध्ये असलेले तब्बल १४.५ किलो गोमांस पोलिसांनी दुचाकीच्या डिक्कीतून जप्त केले. ज्याची किंमत २९०० रुपये आहे. पोलिसांनी या कार्यवाहीत गोमांस व विना क्रमांकाची दुचाकी असा एकूण २२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी मोहम्मद अनिस अब्दुल रशीद कुरेशी (५०) रा. मोमीनपुरा याला अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने, हेड कॉन्स्टेबल गजानन होडगीर व डीबी पथकाने केली.
No comments: