Latest News

Latest News
Loading...

त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यातून कायम बडतर्फ करण्यासंदर्भात बजावण्यात आली नोटीस


प्रशांत चंदनखेडे वणी 

सट्टा मटका खेळण्याचे प्रचंड शौकीन असलेल्या दोन पोलिसांनी मटका व्यावसायिकाची लाखो रुपयांची उधारी झाल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने मटका व्यावसायिकाने त्या दोन्ही पोलिसांची ऑनलाईन मटका आकडे लावतांनाची व्हॉट्सॲप चॅटिंग सोशल मीडियावर वायरल केली. मोबाईलवरून मटक्याचे आकडे लावतांनाची व्हॉट्सॲप चॅटिंग सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. परंतु निलंबनाचा काळ संपल्यानंतर त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. मात्र कार्यालयीन चौकशीत ते दोषी आढळल्याने त्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना एसपींनी सेवेतून कायम बडतर्फ करण्यासंदर्भात नोटीस बजाविल्याची खमंग चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे. यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन झाल्यानंतरही व त्याची नंतर इतरत्र बदली होऊनही तो वणी पोलिस स्टेशनच्या कलेक्शनची कमान सांभाळून होता. एसपींनी सेवामुक्त करण्यासंदर्भात बजाविलेल्या नोटीसचे या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना १० दिवसांत उत्तर सादर करायचे आहे.

वणी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असतांना येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांची मोबाईलवरून मटक्याचे आकडे लावतांनाची व्हॉट्सॲप चॅटिंग समाज माध्यमांवर प्रचंड वायरल झाली होती. हे दोन्ही पोलिस कर्मचारी प्रचंड मटका खेळायचे. मोबाईल वरून ते मटका व्यावसायिकाकडे मटक्याचे आकडे लावायचे. मटका लागला तर मटका व्यावसायिकाकडून पूर्ण पैसे घ्यायचे. आणि मटका लागला नाही की मटका व्यावसायिकाला उधारीच्या खात्यात पैसे लिहून ठेवायला सांगायचे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची मटक्याची उतारी घेतांना अवैध मटका व्यावसायिकाची त्यांच्यावर जवळपास ३५ लाखांची उधारी झाली होती. अशा प्रकारचा व्हिडीओ त्यावेळी सोशल मीडियावर वायरल झाला होता.  

नंतर हे दोन्ही पोलिस कर्मचारी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने मटका व्यावसायिकाने या दोन्ही पोलिसांकडे उधारीच्या पैशासाठी तगादा लावला होता. मात्र या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास सरळ नकार दिला. पोलिसी रुबाब दाखवून ते मटका व्यवसायिकालाच दमदाटी करू लागले. मटक्याची लाखो रुपयांची उधारी करून या दोन्ही पोलिसांनी मटका व्यावसायिकाला ठेंगा दाखविल्याने मटका व्यावसायिक प्रचंड विवंचनेत आला. त्याचा अवैध धंदाच दिवाळखोरीत निघाला. त्यामुळे त्याने या दोन्ही पोलिसांची मटक्याचे आकडे लावतांनाची व्हॉट्सॲप चॅटिंग समाज माध्यमांवर वायरल केली.

पोलिस कर्मचाऱ्यांची मटका जुगार खेळतांनाची व्हॉट्सॲप चॅटिंग सोशल मीडियावर वायरल होताच पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. तसेच मटका व्यावसायिकाने या दोन्ही पोलिसांनी मटक्याची ३५ लाखांची उधारी थकविल्याचाही सोशल मीडियातून आरोप केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली. अवैध धंद्यांवर कार्यवाही करणारे पोलिसच मटका जुगार खेळत असल्याच्या वायरल चॅटिंगमुळे पोलिस खात्यावर शिंतोडे उडविण्यात आले. त्यामुळे एसपींनी या दोन्ही पोलिसांना तडक निलंबित केले. तसेच त्यांच्यावर कार्यालयीन चौकशी बसविली. 

कार्यालयीन चौकशीत ते दोषी आढळून आल्याने त्यांना पोलिस सेवेतून कायम बडतर्फ करण्यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली असल्याच्या चर्चेला पोलिस वर्तुळात उधाण आले आहे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यातून सेवामुक्त करण्यात का येऊ नये, या संदर्भात १० दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मटका कनेक्शनमुळे पोलिस खात्यावर त्यावेळी प्रचंड टीकेची झोड उठली होती. त्यामुळे वरिष्ठांनी कठोर भूमिका घेत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस खात्यातून कायम निलंबित करण्यासंदर्भात नोटीस बजावली असल्याची जोरदार चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे. 

No comments:

Powered by Blogger.