प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना जाती वरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या उपसरपंचावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल राजेश्वर कुंटावार असे या गुन्हा दाखल झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे.
मुकुटबन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने सरपंच पदाचा मान तर राखलाच नाही, उलट एका महिलेला अश्लील शिविगाळ व अपमानास्पद शब्ध प्रयोग करून तिला चार चौघात अपमानित केले. ग्रामपंचायतीची सरपंच असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत मजल वाढलेल्या गुंड प्रवृत्तीच्या अनिल कुंटावार याच्या विरुद्ध महिला सरपंचाने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
मुकुटबन ही झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायत हद्दीत अनेक छोटे मोठे व्यवसाय, मोठमोठ्या कंपन्या व कारखाने उभारण्यात आल्याने या ग्रामपंचायतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आर्थिक संपन्न अशीही ग्रामपंचायत आहे. मुकुटबन येथीलच रहिवाशी असलेल्या मिना जगदीश आरमुरवार (३८) या मुकुटबन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. ३० मे ला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरम अभावी ही मासिक सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे सरपंच मिना आरमुरवार या ग्रामपंचायती बाहेर पडत असतांना त्यांना उपसरपंच अनिल कुंटावार हे ग्रामपंचायत कार्यालयात येतांना दिसले. अनिल कुंटावार याच्या सोबत गावातील एक महिलाही होती. उपसरपंच अनिल कुंटावार यांनी सरपंच मिना आरमुरवार यांना एका शिफारस पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. मात्र सरपंचांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला.
त्यावरून अनिल कुंटावार यांचा पारा भडकला. त्यांनी सरळ सरपंचांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे सुरु केले. एवढेच नाही तर उपसरपंच अनिल कुंटावार हा सरपंच महिलेच्या अंगावर धावून आला. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जातीय मानसिकतेतून तो सरपंचांना अर्वाच्च शिवीगाळ करीत होता. हा कल्लोळ ऐकून तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी त्याठिकाणी आले व त्यांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. मात्र उपसरपंचाने गुंड प्रवृत्ती प्रमाणे वर्तन केल्याने चार चौघात अपमानित व दुखावलेल्या अंतःकरणातून सरपंचांनी थेट मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. अश्लील व जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व अंगावर चाल करून येणाऱ्या उपसरपंच अनिल कुंटावार याच्या विरुद्ध सरपंच मिना आरमुरवार यांनी नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात मुकुटबन पोलिस करीत आहे
No comments: