प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील सेवानगर येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. २ जूनला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. तो गांडली पुरा येथील एका घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुमित शरद कामटकर (१९) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
तरुणवर्ग नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ लागल्याने पालकवर्ग कमालीचा चिंतेत आला आहे. शहरात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. एका पाठोपाठ एक आत्महत्या होऊ लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच चालल्याने समुपदेशन होणे आता नितांत गरजेचे झाले आहे. सेवानगर येथे परिवारासह राहत असलेला तरुण मित्राकडे हळदीचा कार्यक्रम असल्याचे कारण सांगून घराबाहेर पडला. हळदीच्या कार्यक्रमाला उशीर होणार असल्याने रात्री घरी परतणार नसल्याचेही त्याने कुटुंबियांना सांगितले. १ जूनला रात्री तो घरून बाहेर पडला आणि २ जूनला पहाटे त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील नारायण निवास समोरील गांडली पुरा येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या एका घरात तो गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या मित्राला आढळून आला. मित्राने ही माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना दिली. सुमितने गळफास घेतल्याची माहिती वडिलांना मिळताच त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी तात्काळ सुमितने गळफास घेतलेल्या घराकडे धाव घेतली. तेथे सुमित हा खिडकीच्या ग्रीलला स्कार्फने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी एकच हंबरडा फोडला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शीघ्र घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र तरुण मुलाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: