रेल्वे स्टेशन जवळील गौरकार कॉलनी येथील व्यावसायिक मैदानावर रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालतो क्रिकेटचा खेळ
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन जवळ) येथे रहिवासी वस्तीलगत एका व्यावसायिकाने व्यावसायिक दृष्टिकोनातून खेळाचे मैदान तयार केले आहे. या मैदानावर तासिक शुल्क भरून क्रिकेट खेळले जाते. क्रिकेटचा छंद, आवड व वेड लागलेले तरुण शहराच्या कानाकोपऱ्यातून येथे क्रिकेट खेळण्याकरिता येतात. गल्ली क्रिकेट प्रमाणे येथे क्रिकेटचे सामने खेळले जातात. क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांचा सारखा कल्लोळ व गोंधळ येथे सुरु असतो. त्यामुळे येथील रहिवाशी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेत क्रिकेट खेळतांना खेळाडू जेवढे ओरडत नसतील त्याहीपेक्षा जास्त हे गल्ली क्रिकेट खेळणारे नरडे फाडून ओरडतात.
या मैदानाला लागून व आजूबाजूला अनेक कुटुंबं राहतात. कुटुंबातील महिला व मुलींना लाजिरवाणे वाटावे असे अश्लील शब्द हे गल्ली क्रिकेट खेळणारे तरुण तोंडातून ओकतात. या मैदानावरील खेळला कुठलेही वेळेचे बंधन नाही. मध्यरात्री २ ते ३ वाजेपर्यंत क्रिकेट खेळणाऱ्या या तरुणांचा गोंधळ सुरु असतो. त्यामुळे येथील नागरिकांची झोपमोड होत असल्याने त्यांच्या मधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. व्यावसायिक म्हणतो मैदानावर खेळ खेळणाऱ्यांना कुठलेही वेळेचे बंधन नसते. पण मैदान जर व्यावसायिक असेल आणि मैदानालाच लागून नागरिकांची घरे असतील, तर मग त्यांनी विनाकारण त्रास सहन करायचा काय, असा प्रश्न आता येथील नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन जवळ) येथे एका व्यावसायिकाने मिनी ग्राऊंड (खेळाचे मैदान) तयार केले आहे. येथे क्रिकेट खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात तरुण येतात. सातशे ते आठशे रुपये तासाप्रमाणे शुल्क आकारून येथे क्रिकेट खेळू दिले जाते. रात्री उशिरा पर्यंत क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांचा गोंधळ सुरु असतो. क्रिकेट खेळतांना जोरजोरात हे तरुण किंचाळ्या फाडतात. अश्लील शब्द प्रयोग करतात. मोटारसायकल जोरजोरात रेस करून रहिवासी वस्त्यांमधून सुसाट मोटारसायकल चालवितात. त्यामुळे येथील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. या मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्यांना कुठलेच नियम बंधन नाही. व्यावसायिकही म्हणतो मैदानावर खेळणाऱ्यांना कुठलेच वेळेचे बंधन नसते. पण हे मैदान नागरिकांच्या घरांना लागून आहे. या मैदानाच्या आजूबाजूला निव्वळ ताराच्या जाळ्या आहेत. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांच्या कल्लोळाने नागरिकांची रात्री झोप होत नसल्याने येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.व्यावसायिक मैदानालगत घरे असलेले बहुतांश नागरिक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना डॉक्टारांनी बेडरेस्ट सांगितला आहे. पण क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांच्या कल्लोळाने त्यांची रात्रीची झोपमोड होत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यातल्या त्यात शहरात चोरी व घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. क्रिकेट खेळणारे हे तरुण रात्री २ ते ३ वाजेपर्यंत क्रिकेट खेळतात. तरुणांची येथे मोठी झुंबड असते. क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरीचे डाव साधू शकतात. त्यामुळे या मैदानावर रात्री उशिरापर्यंत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटवर वेळेचे बंधन लावण्याची मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
No comments: