Latest News

Latest News
Loading...

आता हायवा टिप्परांनी नाही तर मालवाहू ट्रकांनी केली जाते रेती तस्करी, रेती तस्करी करणाऱ्या दोन मालवाहू ट्रकांवर शिरपूर पोलिसांची कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर शिरपूर पोलिसांनी कार्यवाही करून दोन्ही ट्रक पोलिस स्टेशनला लावले आहेत. कुणालाही संशय येणार नाही अशी शक्कल लढवून मालवाहू ट्रकांनी करण्यात येणारी रेती तस्करी शिरपूर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. वाळू माफियांच्या पुष्पा स्टाईल वाळू तस्करीचा शिरपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही धडक कार्यवाही ६ जूनला चारगाव चौकी-पुनवट मार्गावरील शेलू (बु) गावाजवळ करण्यात आली. 

तालुक्यात वाळू तस्करी जोरात सुरु आहे. रेती घाटांवर अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. विविध शक्कली लढवून वाळू माफिया वाळूची तस्करी करतांना दिसत आहेत. हायवा ट्रक व टिप्परने रेतीची तस्करी करणारे तस्कर आता मालवाहू ट्रक मधून रेती तस्करी करू लागले आहेत. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने मालवाहू वाहनावर ताडपत्री बांधून वाळू तस्करीची नवी शक्कल लढविणाऱ्या तस्करांचा वाळू चोरीचा प्रयत्न  गुन्हेगारी वर्तुळावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांनी हाणून पाडला आहे. वाळू तस्कर कितीही शातीर असले तरी ठाणेदार माधव शिंदे यांचं खबरी नेटवर्क दूरवर पसरलं आहे. शातीर असलेल्या गुन्हेगारांचा बुरखा फाडून त्यांनी कित्येक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

चारगाव चौकी - पुनवट मार्गाने वाळूची तस्करी सुरु असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार माधव शिंदे यांना मिळाली. या माहिती वरून ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलिस पथकासह शेलू (बु) गावाजवळ नाकाबंदी केली. या मार्गाने येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या तपकिरी रंगाच्या मालवाहू वाहनांची तपासणी करीत असतांनाच पोलिसांना सांगितलेल्या वर्णनाचे दोन मालवाहू ट्रक या मार्गाने येतांना दिसले. पोलिसांनी दोन्ही ट्रकांना थांबवून ट्रकांवर बांधून असलेली ताडपत्री सोडून बघितली असता दोन्ही ट्रकांमध्ये लाल रंगाची वाळू भरून असलेली दिसली. ट्रक चालकांना रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे या दोन्ही ट्रकांमधून विना परवाना रेतीची वाहतूक केली जात असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. 

पोलिसांनी ट्रक चालकांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी सय्यद शहाबुद्दीन सय्यद अफसर (३३) व शेख हसन इमाम शेख उवेदूर रज्जाक (५१) दोघेही रा. पुसद अशी सांगितली. पोलिसांनी या दोन्ही रेती तस्करांना अटक केली. या कार्यवाहीत पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीचे दोन मालवाहू ट्रक (MH २९ BE ६२९६, MH २९ BE ६२९७) किंमत ५० लाख रुपये आणि दोन्ही ट्रकांमधील २४ ब्रास रेती किंमत १ लाख ९२ हजार रुपये असा एकूण ५१ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहवा प्रशांत झोड, पोकॉ पंकज कुळमेथे यांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.