Latest News

Latest News
Loading...

ग्रा.प. सदस्य महिलेवर फावड्याने चढविला हल्ला, डोक्यावर फावडे मारून केले गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

महिला ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ करीत फावड्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना ११ जूनला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वांजरी या गावात घडली. याबाबत महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी पती पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. 

वांजरी ग्रामपंचायत सदस्य असलेली वर्षा हनुमान परचाके (४७) ही महिला वार्डात रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने त्याची पाहणी करण्यास गेली असता गावातीलच बंडू बन्सी सिडाम हा देखील तेथे आला. रस्त्याच्या बांधकामावरून बंडू सिडाम याचा ग्रा.प. सदस्य महिलेशी जोरदार वाद झाला. तसेच तो सरपंच, उपसरपंच व सदस्यांनाही शिवीगाळ करू लागला. बंडू सिडाम हा शिवीगाळ करीत असतांना महिलेने त्याला शिव्या कशाला देतो, असे म्हटले. त्यावर बंडू सिडाम सदस्य महिलेवर चांगलाच  भडकला. रागाच्या भरात त्याच्या तोंडून अश्लील शब्द बाहेर पडले. महिलेला अश्लील शिवीगाळ करतांनाच त्याने महिलेवर फावड्याने हल्ला चढविला. महिलेच्या डोक्यावर त्याने फावड्याचा वार केला. 

फावड्याचा पहिला वार केल्यानंतर परत दुसऱ्यांदा तो महिलेवर फावड्याने वार करणार तेवढ्यात महिलेच्या पतीने त्याला पकडले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बंडू सिडामने डोक्यावर फावडे मारल्याने महिला खाली पडली. तेंव्हा बंडू सिडामच्या पत्नीनेही वर्षा यांना केस पकडून मारहाण केली. त्यांचे डोके जमिनीवर आपटले. त्यामुळे वर्षा यांना चक्कर आली. त्यांच्या पतीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

दरम्यान त्यांनी झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. वर्षा परचाके यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी बंडू सिडाम व त्याच्या पत्नीवर बीएनएसच्या कलम १०९, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.