प्रशांत चंदनखेडे वणी
शेताच्या धुऱ्यावर दगडं ठेवल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. एका महिलेने दुसऱ्या महिलेला विळा मारून जखमी केल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशनतर्गत येणाऱ्या चेंडकापुर येथील पंचधार शेत शिवारात सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यातील चेंडकापुर या गावात पती व मुलासह राहणारी कमल गौतम लोणारे (६३) ही महिला शेतमजुरी करते. त्यांचे पंचधार शिवारात शेत आहे. त्यांच्याच शेताला लागून वडस्कर यांचे शेत आहे. वडस्कर यांच्या शेताचा धुरा कमल लोणारे यांच्या शेताला लागून असल्याने त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटके उडत असतात. ६ जूनला सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान कमल लोणारे या आपल्या पतीसह शेतात गेल्या. नंतर ते दोघेही त्यांनी ठेक्याने केलेल्या शेताकडे जात असतांना शारदा केशव वडस्कर (३२) या महिलेने शेताच्या धुऱ्यावर दगडं का ठेवले, यावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यावर कमल लोणारे यांनी दगडं आम्ही नाही तर तुमच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी ठेवले असावे, असे म्हटले. परंतु शारदा वडस्कर काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्यांनी कमल लोणारे यांच्याशी टोकाचा वाद घालत हातातील विळा कमल लोणारे यांच्या हातावर मारला. तसेच त्यांना नखांनी ओरबाडून जखमी केले.
त्यामुळे कमल लोणारे यांनी झालेल्या मारहाणी बाबत शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. कमल लोणारे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी शारदा वडस्कर यांच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
No comments: