तुम्हाला अशा प्रकारे बकरा विकणे शोभत नाही, यावरून झालेल्या वादातून लोखंडी रॉड व दगडाने मारून केले जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
वार्डातील ओळखीच्या व्यक्तींनी बकरा विकल्याने त्यांना शहाणपण शिकवायला गेलेल्या युवकाला त्या व्यक्तींनी चांगलेच बदडले. एवढेच नाही तर त्याला लोखंडी रॉड व दगडाने मारून जखमी केले. ही घटना ६ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे.
शहरातील आयटीआय कॉलनी येथे राहणाऱ्या अजय मधुकर पायघन (४२) यांच्याच वार्डात ज्ञानेश्वर निमकर (५०) व भोलानाथ निमकर (३८) हे राहतात. ज्ञानेश्वर व भोलानाथ यांनी पाळलेला बकरा विकल्याने अजय पायघन यांचं मन दुखावलं. त्यांनी ज्ञानेश्वर निमकर यांच्या घरी येऊन तुम्ही बकरा विकला हे तुम्हाला शोभलं नाही, असा त्यांना उपदेशाचा डोज पाजला. त्यावरून ज्ञानेश्वर निमकर व भोलानाथ निमकर चांगलेच संतापले. त्या दोघांनीही अजय पायघन यांच्या घरी जाऊन त्यांना येथेच्छ बदडले. तसेच संतापाच्या भरात त्या दोघांनी त्यांना लोखंडी रॉड व दगडाने मारून जखमी केले.
अजय पायघन हे घराकडे जात असतांना त्यांना दोन अनोळखी इसम दुचाकीवर बकरा नेतांना दिसले. त्यांनी त्या दोघांना बकरा कुणाकडून विकत घेतला असा प्रश्न केला. त्यावर त्या दोघांनी बकरा तुमच्याच वार्डातील ज्ञानेश्वर व भोलानाथ निमकर यांच्या कडून विकत घेतल्याचे सांगतानाच तुम्ही त्यांना विचारून घ्या असे म्हटले. त्यावर अजय पायघन हे त्या दोघांना घेऊन ज्ञानेश्वर निमकर यांच्या घरी गेले. त्यांनी ज्ञानेश्वर व भोलानाथ निमकर यांना तुम्हाला अशा प्रकारे बकरा विकणे शोभत नाही, असा उपदेशाचा डोज पाजून ते घरी निघून गेले. अजय पायघन यांच्या अशा या बोलण्याने ज्ञानेश्वर व भोलानाथ यांची माथी भडकली. नंतर ते दोघे व ज्ञानेश्वरचा मुलगा असे तिघे जण अजय पायघन यांच्या घरी गेले. त्यांना आवाज देऊन घराबाहेर बोलावले, व चांगलेच बदडले. ज्ञानेश्वरने लोखंडी रॉडने तर भोलानाथने दगडाने मारून त्यांना जखमी केले.
मारहाणीत जखमी झालेल्या अजय यांना त्यांच्या वडिलांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर अजय पायघन यांनी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी ज्ञानेश्वर निमकर, भोलानाथ निमकर व अन्य एक अशा तीन आरोपींवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
No comments: