प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील सिंधी कॉलनी (गुरु नगर) परिसरातील एका दुकानावर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. ही कार्यवाही १८ जूनला दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुंगंधीत तंबाखूचा साठा, विक्री व वाहतूक करण्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध लावला असतांनाही शहरात सुगंधित तंबाखूची अवैध विक्री जोरात सुरु आहे. शहरातील काही अवैध विक्रेत्यांकडून सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा व पान मसाल्याची सर्रास विक्री केली जात आहे. वणी शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्याने अन्न व औषधी प्रशासनाच्या यवतमाळ पथकाने याबाबत अधिक माहिती मिळवून रेस्ट हाऊस समोरील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या ज्योती किराणा अँड जनरल शॉप या दुकानावर धाड टाकली.
या दुकानात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या धडक कार्यवाहीत अन्न व औषधी प्रशासनाच्या यवतमाळ पथकाने ३० हजार ६१३ रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. दुकानात अवैध विक्री करीता सुगंधित तंबाखूचा साठा करणाऱ्या मनिष नंदकिशोर फेरवानी (३१) या दुकान मालकाविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी सिमा रामसूरकर (अन्न व औषधी प्रशासन यवतमाळ) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मनिष फेरवानी याच्यावर अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ व २०११ च्या विविध कलमान्वये तथा बीएनएसच्या कलम २२३, २७४, २७५ व १२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: