अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्य आटपून घरी परतांना काळाने घातला घाला
प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवार २१ जूनला सकाळी ६.ते ६.३० वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील साईलिला नगरी जवळील राज डिलक्स बियरबार जवळ घडली. अमर रतन करसे वय अंदाजे ४५ वर्षे रा. सेवानगर असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
शहरातील सेवानगर येथे परिवारासह राहत असलेले अमर करसे हे झरीजामणी ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते. रुग्णालयातील रात्रपाळीतील कर्तव्य आटपून ते सेवानगर येथे आपल्या घरी परतत असतांना वणी मुकुटबन मार्गावरील साईलिला नगरी जवळील राज डिलक्स बियरबार जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनाच्या चाकाखाली ते अक्षरशः चिरडल्या गेले. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रुग्णालयातील कर्तव्य आटपून घरी परतत असतांना मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला आणि काळाने त्यांना कायमचे हिरावून घेतले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. कुटुंबं दुःख सागरात बुडालं आहे. अमर करसे यांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले (एक ७ वीत व एक १० वीत) असा आप्त परिवार आहे.
दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. आसपासच्या नागरिकांना दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शीघ्र घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: