Latest News

Latest News
Loading...

विधवा महिलेसोबत एकत्र राहणाऱ्या तरुणाने तिला संशयातून चाकूने मारून केले जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

विधवा महिलेसोबत एकत्र राहत असलेल्या तरुणाने महिलेवर संशय घेऊन तिला बेदम मारहाण व चाकूने मारून जखमी केल्याची घटना पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मारोती पोड ता. झरी येथे १७ जूनला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 

झरी तालुक्यातील मारोती पोड येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विधवा महिलेवर जीव जडलेल्या २५ वर्षीय तरुणाने नंतर तिच्यावर संशय घेऊन तिला केस पकडून मारहाण करतांनाच तिच्या डोक्यावर चाकू मारून जखमी केले. महिलेच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला दोन मुली आहेत. ती शेती करून आपला प्रपंच चालवते. अशातच लेतु सखाराम टेकाम हा तरुण या विधवा महिलेच्या जीवनात आला. त्याचा या महिलेवर जीव जडला. लेतु टेकाम हा मूळचा रूडा ता. केळापूर येथील रहिवाशी असून हल्ली तो मारोती पोड येथे राहतो. त्याने या विधवा महिलेशी जवळीक साधत तिला आधार देण्याचा विश्वास दर्शविला. तिला तो शेत कामातही मदत करू लागला. तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवून त्याने तिच्या दोन मुलींचा सांभाळ करण्याचीही जबाबदारी स्विकारली. महिलेचा व तिच्या मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे ही महिला लेतु टेकाम सोबत तिच्या घरी एकत्र राहू लागली. 

मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. महिला फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचा त्याला संशय आला. त्यामुळे तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. १७ जूनला सायंकाळी ६ वाजता महिला शेतातून घरी परतल्यानंतर त्याने महिलेशी टोकाचा वाद घातला. तू फोनवर कुणाशी बोलत आहे, असा संशय घेऊन त्याने महिलेला केस पकडून बेदम मारहाण केली. तसेच तिच्या डोक्यावर चाकू मारून तिला जखमी केले. तिला अश्लील शिवीगाळ करीत तू फोनवर कुणासोबत बोलत आहे, असे म्हणत त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणाच्या या वर्तनामुळे भयभीत झालेल्या महिलेने सरळ पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. शंकुतला विलास टेकाम (३५) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी लेतु सखाराम टेकाम (२५) याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१) ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.