Latest News

Latest News
Loading...

प्रगती नगर येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कम व मोटारसायकल केली लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील प्रगती नगर येथील कुलूपबंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व घराबाहेर ठेऊन असलेली मोटारसायकल लंपास केल्याची घटना १५ जून सायंकाळी ७ ते १६ जून सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शहरात घरफोडी व चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने शहरवासी कमालीचे धास्तीत आले आहेत. शहरातील प्रगती नगर येथे राहणारे गजानन महादेव पावडे हे ११ जूनला परिवारासह बाहेरगावी फिरायला गेले. त्यांनी शिंदोला येथे राहणाऱ्या आपल्या भाच्याला फोन करून आजी एकटीच घरी असल्याने आजीला आपल्या घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा भाचा सुप्रतोष संतोष गौरकार (२३) रा. शिंदोला हा १२ जूनला गजानन पावडे यांच्या घरी आला व आजीला शिंदोला येथे घेऊन गेला. 

त्यानंतर १६ जूनला तो आजीला प्रगती नगर येथील घरी सोडण्याकरिता आला असता त्याला त्याच्या मामाच्या घराच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घराच्या आवारात उभी असलेली मोटारसायकल त्याला तेथे आढळून आली नाही. त्याने घरात जाऊन बघितले असता घरातील सर्व सामानही अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच कपाटाचे दारही उघडे दिसले. त्यामुळे घरी चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच ही माहिती आपल्या मामाला दिली. मामाने कपाटात १५ हजार रुपये रोख रक्कम ठेऊन असल्याचे भाच्याला सांगितले. परंतु चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कमही लंपास केल्याचे भाच्याच्या निदर्शनास आले. 

चोरट्यांनी घरातील कपाटात ठेऊन असलेले रोख १५ हजार रुपये आणि मोटसरसायकल (MH २९ AH ४१९३) किंमत २५ हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार गजानन पावडे यांचा भाचा सुप्रतोष गौरकार यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर ३०५(a), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.