Latest News

Latest News
Loading...

घरफोडीचे सत्र सुरूच, काळे ले-आऊट येथे घरफोडी करून चोरट्यांनी पावणे तीन लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात चोरी व घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. शहर चोरट्यांसाठी खुले रान बनल्याचे दिसून येत आहे. दाट लोकवस्तीतही चोरीचा डाव साधून चोरटे एक प्रकारे पोलिसांना आव्हान देऊ लागले आहेत. चोरट्यांना पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे वाढत्या चोरीच्या घटनांवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांत शहर व शहरालगत घडलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नसतांनाच शहरात परत घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात साफ केला. ही जबरी चोरीची घटना काळे ले-आऊट येथे ३१ मे ते २ जून दरम्यान घडली. २ जूनला सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. 

शहरातील काळे ले-आऊट येथे राहणारे शेख मोबीन शेख सलाम (५४) हे ३१ मे ला परिवारासह लग्न समारंभाकरीता गेले होते. घराला कुलूप म्हणजे चोरट्यांना एकप्रकारे चोरीची पर्वणीच देण्यासारखं झालं आहे. कुलूपबंद घर चोरट्यांसाठी चोरीचं आमंत्रण ठरू लागलं आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले. घराच्या खोलीतील कपाट फोडून त्यात ठेऊन असलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तीन तोळ्याचा सोन्याचा हार (१ लाख ८० हजार), अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कर्णफुले (३० हजार), ३ ग्रामची सोन्याची अंगठी (१५ हजार), २५ तोळे वजनाचे चांदीचे चाळ (१८ हजार), दोन तोळे वजनाची चांदीची चैन (२ हजार) आणि रोख ३० हजार रुपये अशा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. 

२ जुनला सकाळी ८ वाजता शेख मोबीन शेख सलाम हे घरी परतल्यानंतर त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता त्यांना घराचे रान झाल्याचे दिसून आले. घरातील सामान पूर्णतः विखुरलेले होते. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याचे कळून चुकले. लोखंडी कपाटातील सोन्याचांदीच्या वस्तू व रोख रक्कमेवरही चोरट्यांनी हातसाफ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सरळ पोलिस स्टेशनला येऊन घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरात धडाड चोरीच्या घटना घडत असतांना चोरटे पोलिसांना गवसत नाही, याचेच नवल वाटते. चोरट्यांचा शोध घेण्याची पोलिसांची दृष्टी मंदावली की काय, अशा चर्चा आता शहरातून ऐकायला मिळत आहे. शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने शहरवासी कमालीचे धास्तीत आले आहेत.  

No comments:

Powered by Blogger.