प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रसिद्ध डॉक्टर प्रिया चंद्रशेखर झाडे यांचं दीर्घ आजारानं सोमवार दि. २ जूनला रात्री १० वाजताच्या सुमारास निधन झालं. त्या व्ह्रदय विकाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर सतत उपचार सुरु होते. अशातच २ जूनला त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. प्रिया येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर चंद्रशेखर झाडे यांच्या अर्धांगिनी होत्या. डॉक्टर पती पत्नीमध्ये अतिशय प्रेम व जिव्हाळा होता. सुख समृद्धी व आनंदाने संसार सुरु असतांना डॉ. प्रिया अचानक सर्वांना सोडून निघून गेल्याने कुटुंबं दुःख सागरात बुडालं आहे. सुखी संसारात डॉ. प्रिया यांची अकाली एक्झिट पती चंद्रशेखर यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. डॉ. प्रिया यांच्या जाण्याने डॉ. चंद्रशेखर यांना दुःख अनावर झालं आहे. अवघ्या काही वर्षाच्या संसारातच पती पत्नीची कायमची तुटातूट झाल्याने परिवारात दुःखाची लाट पसरली आहे. डॉ. चंद्रशेखर हे पत्नी वियोगाने प्रचंड हळहळले आहेत.
शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील महादेव नगरी येथे डॉ. प्रिया झाडे परिवारासह राहत होत्या. त्या मागील काही दिवसांपासून व्ह्रदय विकाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार करण्यात आले, व उपचार सुरूही होते. अशातच व्ह्रदय विकाराने त्यांचं २ जूनला रात्री १० वाजता राहत्या घरी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यू समयी त्यांचं वय अवघ्या ३५ वर्षांचं होतं. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. प्रिया यांच्या पश्चात पती चंद्रशेखर झाडे व मुलगी नायरा असा आप्त परिवार आहे. डॉ. प्रिया यांच्या जाण्याने चिमुकलीच्या डोक्यावरील मायेचं छात्र हरपलं आहे. आज मंगळवारला सकाळी ११.३० वाजता राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार आहे. चिखलगाव येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. डॉ. प्रिया झाडे यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments: