प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या भांदेवाडा कर्मचारी वसाहतीतील एका क्वार्टर जवळ उभी असलेली बुलेट अज्ञात आरोपींनी आगीच्या स्वाधीन केल्याची खळबळजनक आणि तेवढीच संतापजनक घटना २१ जूनला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
भांदेवाडा डब्ल्यूसीएल क्वार्टरमध्ये राहत असलेल्या पानमती गुलाब भारती (५५) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचा लहान मुलगा सचिन गुलाब भारती याने २० जूनला सायंकाळी ७.३० वाजता क्वार्टर जवळ बुलेट उभी केली, आणि तो वरच्या माळ्यावरील क्वार्टरमध्ये आला. सचिन हा कामावर जाण्यायेण्याकरिता ही बुलेट वापरायचा. नेहमी प्रमाणे त्याने डब्ल्यूसीएल क्वार्टरच्या इमारतीखाली बुलेट उभी केल्यानंतर रात्री अज्ञात आरोपींनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बुलेट पेटवून दिली. आरोपींनी क्वार्टरच्या मागच्या बाजूला असलेल्या बालू कारेकर यांच्या शेतात नेऊन ही बुलेट जाळली. आरोपींनी ज्वलनशील द्रव्य टाकून बुलेटला आग लावल्याने बुलेट पूर्णतः जळून खाक झाली. यात बुलेट मालकाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही बुलेट पानमती भारती यांचा मोठा मुलगा मनोज गुलाब भारती याच्या नावावर होती. आरोपींनी क्वार्टरजवळ उभी असलेली बुलेट बालू कारेकर यांच्या शेतात नेऊन जाळल्याने भारती कुटुंबं चांगलंच धास्तीत आलं आहे. सकाळी ७ वाजता गावातीलच सुरज चिंचोलकर याला शेतात बुलेट जळतांना दिसल्याने त्याने सचिनला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपींनी आगीच्या स्वाधीन केलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची ही बुलेट (MH २९ CC ६७४९) पूर्णतः जळून खाक झाल्याने बुलेट मालकाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पानमती भारती यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर बीएनएसच्या कलम ३२६(f) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: