प्रशांत चंदनखेडे वणी
दारूचे व्यसन जडलेले युवक दारूची तलब भागविण्याकरिता कुठल्या स्तराला जातील याचा नेमच राहिला नाही. त्यांचा दारूचा खर्च उचलण्यास नकार देणाऱ्याला ते मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाही. ओळखीच्या लोकांवर दबाव आणून ते त्यांना आपला दारूचा खर्च उचलण्यास भाग पाडतात. आपली दारूची गरज भागविण्याकरिता ते दररोज नवनवीन लोकांचा शोध घेतात. दारूसाठी त्यांच्याकडे तगादा लावतात. लाडी गोडी लावून त्यांच्याकडून आपली दारूची तलब भागवून घेतात. मात्र एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या आग्रहानंतरही त्यांचा दारूचा खर्च उचलण्यास नकार दिल्यास ते त्याच्याशी झगड्यावर उतरतात. एवढेच नाही तर त्याला मारहाण करण्यापर्यंत ते धजावतात. अशाच एका दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने त्याला दारू पाजण्यास नकार देणाऱ्या युवकाशी वाद घालून त्याला लाकडी दांड्याने मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील वाघदरा (नवीन) येथे २३ जूनला सायंकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
वाघदरा येथे राहणारा आकाश विनायक उईके (३२) हा युवक ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. तो दारूचा प्रचंड व्यसनी आहे. २३ जूनला सायंकाळी ७.३५ वाजता आकाश हा श्रीरामनगर येथील ऑटो पॉईंट जवळून जात असतांना त्याची नजर गावातीलच विलास रमेश आडे (३०) या युवकावर पडली. आकाश हा विलासला चांगल्या प्रकारे ओळखत होता. ऑटो पॉईंट जवळ उभा असलेल्या विलास जवळ येऊन आकाशने तुझा पगार झाला, चल मला दारू पाज असे म्हटले. त्यावर विलासने मी तुला दारू पाजू शकत नाही, असे म्हणताच आकाशने विलासशी वाद घालत तेथे जमिनीवर पडून असलेला लाकडी दांडा त्याच्या डोक्यावर मारला. त्यामुळे विलासचे डोके फुटून त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून आकाशने लाकडी दांड्याने मारून विलासचे डोके फोडले. त्यामुळे झालेल्या मारहाणी बाबत विलास आडे याने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी आकाश उईके याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: