हेलिकॉप्टर दुर्घटनेने पंडित प्रदीप मिश्राही हळहळले, त्यांनी दिवंगत राजा जयस्वाल यांच्या निवासस्थानाला दिली भेट
प्रशांत चंदनखेडे वणी
उत्तराखंड येथे चारधाम यात्रेदरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील जयस्वाल परिवारातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन हेलावणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले. हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले राजा उर्फ राजकुमार सुरेश जयस्वाल हे शिवभक्त होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा वणी येथे आयोजित केली होती. वणी येथे शिव महापुराण कथेचं भव्य आयोजन करून राजकुमार जयस्वाल यांनी वणीकर जनतेला पंडित प्रदीप मिश्रा यांची प्रत्येक्षात भेट घडवून आणली. त्यांनी वणीच्या इतिहासात एक कीर्तिमान स्थापन केला. शिवभक्त असलेल्या राजकुमार जयस्वाल व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातल्याने पंडित प्रदीप मिश्रा यांनाही शोक अनावर झाला. त्यांनी २३ जूनला वणी येथे येऊन दिवंगत राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली. अपघाती मृत्यू ओढवलेल्या जयस्वाल परिवाराला त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून त्यांनी जयस्वाल कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद क्षणाने तेही भावुक होऊन त्यांचे डोळे पाणावले होते.
शहरातील नामांकित कोळसा व्यापारी राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व चिमुकली काशी जयस्वाल यांचा १५ जूनला केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ९ जूनला ते परिवारासह उत्तराखंड येथे चारधाम यात्रेला गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचे साडू व मेहुणीही होती. मात्र त्या दोघांचं रिझर्वेशन दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये आल्याने ते सुदैवाने बचावले. जयस्वाल कुटुंबं ज्या हेलिकॉप्टरने केदारनाथ वरून गुप्तकाशीच्या प्रवासाला निघालं होतं, ते हेलिकॉप्टर गौरीकुंड जंगलात कोसळलं. या भीषण दुर्घटनेत राजकुमार जयस्वाल यांच्यासह त्यांची पत्नी श्रद्धा व चिमुकली मुलगी काशी हे एकाच कुटुंबातील तीन जण काळाच्या पडद्याआड गेले. राजकुमार जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वीच वणी येथे आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याची वार्ता कळाल्यानंतर पंडित प्रदीप मिश्राही प्रचंड हळहळले.
शिवमहापुराण कथावाचक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेले प्रदीप मिश्रा यांनी वणी येथे येऊन दिवंगत राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जयस्वाल कुटुंबातील तीनही जणांना त्यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्याच्या शांती करीता प्रार्थना केली. तसेच जयस्वाल कुटुंबियांचे सांत्वन केले. राजकुमार जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीच्या दोनही मुलांना त्यांनी जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरविला. या दुःखद क्षणाने तेही भावुक झाले होते. त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. राजकुमार जयस्वाल व त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या दुर्दैवी मृत्यूने समाजमन हळहळलं. अपघातात एक सोज्वळ कुटुंबं मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेल्याने संवेदनशील मनावर त्याचा मोठा आघात झाला आहे.
No comments: