मोबाईलवर संभाषण करीत भरधाव दुचाकी चालवून रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला दिली धडक, पोलिस कर्मचारी वडिलांनाही केली मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
मोबाईलवर संभाषण करीत भरधाव दुचाकी चालविणाऱ्या चालकाने परिवारासह रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलगी जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला जबर मार लागला असून डोक्याला सहा टाके लागले आहेत. एवढेच नाही तर मुलीला धडक दिलेल्या दुचाकीचा फोटो काढणाऱ्या मुलीच्या वडिलांनाही दुचाकी चालकाने जबर मारहाण केली. दुचाकी चालकाने वडिलांच्या तोंडावर बुक्की मारल्याने त्यांचे ओठ फुटून त्यांनाही दोन टाके लागले आहेत. त्यामुळे त्यांनी आधी मुलीवर व स्वतःवर उपचार केल्यानंतर अपघात व त्यांना झालेल्या मारहाणी बाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली, ते वणी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
शहरातील पंचवटी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी हरिभाऊ बळीराम दळवे (३५) हे २२ जूनला सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास पत्नी व दोन मुलींसह मोटारसायकलने शहरातील बाजारपेठेत गेले होते. त्यांना मुलींसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करायचे होते. त्यांनी गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील (नीलम क्रॉकरी) दुकानातून मुलींसाठी वस्तू व साहित्य खरेदी केले. त्यानंतर ते दुचाकी उभी असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ता ओलांडत असतांना खाती चौकाकडून भरधाव येणाऱ्या दुचाकी (MH ३४ CH २९४५) चालकाने त्यांच्या १० वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली. दुचाकीची धडक बसल्याने ती रोडवर पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. दुचाकी चालकाने मोबाईलवर संभाषण करीत भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मुलीला धडक दिल्याने हरिभाऊ दळवे यांनी झालेल्या अपघाताचा मोबाईलमध्ये फोटो काढला.
त्यावर दुचाकी चालक हा त्यांच्या अंगावर चालून आला. दुचाकीचा फोटो का काढला, असे म्हणत त्याने हरिभाऊ दळवे यांच्याशी वाद घालून त्यांच्या तोंडावर बुक्की मारली. त्यामुळे हरिभाऊ दळवे यांचेही ओठ फुटले. दुचाकी चालक मुजोरी करीत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. त्यानंतर हरिभाऊ दळवे यांनी आधी मुलीवर उपचार करण्याला प्राथमिकता देत तिला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिच्या डोक्याला सहा टाके घालावे लागले. तर हरिभाऊ दळवे यांचेही ओठ फुटल्याने त्यांच्या ओठाला दोन टाके पडले आहेत. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिस कर्मचारी हरिभाऊ दळवे यांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर मोटारवाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ व बीएनएसच्या कलम ११५(२), १२५(a), २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अपघात व दादागिरी करणाऱ्या दुचाकी चालकाचा शोध घेतला जात आहे.
शहरात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. वाहन चालक बेशिस्त झाले आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अंतर्गत रस्त्यांवरून सुसाट वाहने चालविली जात आहे. तरुण मुले धूम बाईक चालवितांना दिसतात. वाहन चालकांचे वेगावर जराही नियंत्रण राहिल्याचे दिसत नाही. रस्त्याने पायदळ चालणाऱ्यांना कट मारणे, वाहनांना कट मारून वाहन पुढे काढणे, पास मारण्याकरिता जागा नसतांनाही फुल रेस करून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करणे. रस्त्यांनी आडवी आडवी वाहने चालविणे हे दृश्य आता शहरात नेहमीचेच झाले आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवितांना एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनाला धडक बसल्यास त्यांच्यावरच रुबाब दाखविला जात असल्याने शहरवासी कमालीचे धास्तीत आले आहेत. शहरातील वाहतूक पूर्णतः बेशिस्त झाली असून वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: