Latest News

Latest News
Loading...

वृक्षारोपणाचे धडे गिरविणारी नगर पालिका वृक्षाची कत्तल होऊनही मूग गिळून चूप बसते तेंव्हा...

प्रशांत चंदनखेडे वणी 

"एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत नगर पालिकेकडून शाळा व इतर ठिकाणी वृक्षारोपण केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. वृक्षारोपण करण्याबाबत नगर पालिका किती जागृत आहे, याचा संपूर्ण शहरभर ढोल पिटण्यात आला. वृक्ष लागवडीचे धडे देणारी नगर पालिका जेंव्हा जगलेली झाडं तोडल्यानंतरही मूग गिळून चूप बसते तेंव्हा याला काय म्हणावं हेच कळत नाही. वृक्ष लागवडीवर शासन लाखो रुपये खर्च करते, पण वृक्षांचे संवर्धन व निगा राखण्याकरिता कुठलेही नियम बांधून दिले जात नाही. नगर पालिका प्रशासन वृक्षारोपणाचा गवगवा करून नावालाच जनजागृती करते, पण विनाकारण झाडे तोडणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची धमक दाखविली जात नाही. गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन जवळ) येथील फळाभरलेले मोसंबीचे झाड जेसीबी चालकाने मनमर्जीने मुळासकट उफटून फेकले. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रारही केली होती. मात्र मुर्दाड न.प. प्रशासनाने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. यावरून नगर पालिका प्रशासनाचं दुहेरी रूप समोर येते. 

शासन वृक्षारोपणावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र वृक्षांचं संगोपन व संवर्धनाबाबत कुठलेही नियम बांधून दिले जात नाही. वृक्षारोपण केलेली किती रोपटी जगतात, याची नंतर कुठलीही नोंद घेतली जात नाही. नगर पालिका प्रशासनाकडून शहरात वृक्षारोपण केल्याचा कांगावा केला जातो, पण किती वृक्ष जगले याची लक्षपूर्वक पाहणी केली जात नाही. वृक्षारोपण केले की जबाबदारी संपली, या न.प. च्या धोरणामुळे वृक्षारोपणावरील लाखोंचा खर्च व्यर्थ जात आहे. वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची काळजीच घेतली जात नसल्याने रोपट्यांचं झाडात रूपांतर होत नाही. केवळ शासनाच्या उपक्रमानुसार वृक्षारोपण करण्याचा सोपस्कार पार पाडणे, ही आता वृक्षारोपणाची व्याख्या बनत चालली आहे. कारण वणी नगर पालिका वृक्षांचं संवर्धन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही. 

शहरातील गौरकार कॉलनी परिसरात नगर पालिका हद्दीत ७ ते ८ वर्षांपूर्वी नगर पालिका कर्मचाऱ्यांच्याच उपस्थितीत मोसंबीचं रोपटं लावण्यात आलं होतं. त्यानंतर त्या रोपट्याच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी येथील रहिवाशांनी घेतली. या रोपट्याला खतपाणी देऊन वाढविलं. रोपट्याचं नंतर विशाल वृक्षात रूपांतर झालं. येथील रहिवाशांनी सात ते आठ वर्षे या झाडाची निगा राखली. या झाडाला नंतर भरगच्च मोसंबी लागल्या. झाडाला लदालद लागलेल्या मोसंबी परिसरातील मुलाबाळांसह अबालवृद्धही चवीनं खाऊ लागले. फळाभरलेलं हे मोसंबीचं झाड डोळ्यात भरावं असं होतं. पण या झाडाला कुणाची तरी वाईट दृष्ट लागली. पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली कुठलाही अडथळा नसतांना निर्दयी जेसीबी चालकाने या झाडावर जेसीबी चालविला. आणि फळाभरलेलं हे मोसंबीचं झाड मुळासकट उफटून फेकलं. परंतु अजून पर्यंत या जेसीबी चालकावर व जेसीबीवर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. हे आहे नगर पालिकेचं वृक्षप्रेम. 

पाणी पुरवठ्याची नवीन पाईप लाईन टाकण्याकरिता जेसीबीने खोदकाम करतांना अडथळा नसतांना जेसीबी चालकाने नगर पालिकेची परवानगी न घेता मनमर्जीने हे मोसंबीचे झाड तोडले. यावर नगर पालिकाही मूग गिळून चूप बसली आहे. केवळ तीन घरापर्यंत खोदकाम करून पाईप टाकण्यात आला, आणि समोर पाईप न टाकता काम बंद करण्यात आले. ही आहे नगर पालिका प्रशासनाची विकास कामे करण्याची पद्धत. घरसमोर जेसीबीने खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांच्या घरासमोर आता पावसाचे पाणी साचते. चिखल निर्माण होतो. त्यामुळे त्यांना घरात जाणे येणे करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. निव्वळ तीन घरापर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली. घरासमोरील आवारात खोदकाम करण्यात आलं. आणि मोसंबीचे झाड विनाकारण तोडण्यात आले. 

येथील नागरिकांना रेल्वेच्या मालधक्यांवरून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत असतांना येथे झाडे लावण्याऐवजी जगलेलं झाड तोडण्यात आलं. एक पेड माँ के नाम अशी वृक्षाला आईची उपमा देण्यात आली आहे. आणि येथे आईच्या काळजावर जेसीबी चालविण्यात आला असतांना न.प. प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासंदर्भात न.प.ला पत्रही दिले होते. पण न. प. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे नगर पालिका प्रशासन वृक्षारोपणाचा केवळ दिखावा करीत असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये रंगली आहे. 


1 comment:

Powered by Blogger.