Latest News

Latest News
Loading...

आमदार संजय देरकर यांच्या मध्यस्थीने कोसारा रेती घाटावर सुरु असलेले उपोषण सुटले

प्रशांत चंदनखेडे वणी 

घरकुल लाभार्थ्यांना माती मिश्रित रेती न देता चांगल्या दर्जाची रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीला घेऊन मारेगाव तालुक्यातील कोसारा गावचे उपसरपंच सचिन पचारे यांच्या नेतृत्वात वर्धा नदी पात्रात सुरु करण्यात आलेले आमरण उपोषण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आले आहे. आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपातूनच खनिकर्म अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घरकुल लाभार्थ्यांना वर्धा नदी पात्रातून रेती उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांना रेती मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने दोन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले. 

घरकुल लाभार्थ्यांना उपसा नाल्यातील माती मिश्रित वाळू देण्यात येत होती. ही वाळू अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत होता. घरकुलाचे बांधकाम करतांना माती मिश्रित वाळूचा वापर करणे घरकुल लाभार्थ्यांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे कोसारा गाववासीयांनी वर्धा नदी पात्रातील रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याने उपसरपंच सचिन पचारे यांनी या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच रेती घाटांवर मुबलक रेती असतांना उपसा नाल्यातील माती मिश्रित रेती देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी वर्धा नदीच्या कोसारा रेती घाटावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासनाने सचिन पचारे यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने त्यांनी २ जून पासून गावकऱ्यांसोबत कोसारा रेती घाटावर आमरण उपोषण सुरु केले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. 

उपसरपंच सचिन पचारे हे गावकऱ्यांसोबत उपोषणाला बसल्याने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या, पण प्रशासनाकडून कोणतेच दिलासादायक उत्तर उपोषणकर्त्यांना देण्यात आले नाही. शेवटी दोन दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या गावकऱ्यांची आमदार संजय देरकर यांनी ३ जूनला रात्री भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदारांनी थेट खनिकर्म अधिकाऱ्यांना फोन लावला. घरकुल लाभार्थ्यांना वर्धा नदी पात्रातून रेती उपलब्ध देण्याबाबत खनिकर्म अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदारांनी उपोषणकर्त्यांना आश्वासित केले. आमदार संजय देरकर यांनी मध्यस्थी केल्याने उपोषणकर्त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले. 

तसेच आमदार संजय देरकर यांनी तहसीलदार निलावार यांना गारगोटी व पुष्पा रेतीघाट घाटातूनही घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी तहसीलदार निलावार यांच्यासह मंडळ अधिकारी कांडालकर, तलाठी वानखेडे, सरपंच छाया खाडे, प्रविण विखनकर, प्रेमराज गाणार, दिलीप पचारे, अंकुश खाडे, रेखा चिंचोलकर, पांडुरंग नंन्नावरे, सुभाष खडसे, कवडू येरमे, देव किनाके, किसनराव लांडगे, तथा कोसारा गाववासी उपस्थित होते.  

No comments:

Powered by Blogger.