प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली. ही घटना ५ जूनला दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास ब्राह्मणी गावाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला. ट्रकची वायरिंग शॉर्ट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलारपिंपरी कोळसाखाणीतून रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला (MH ३४ ४९१७) अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी ट्रकची संपूर्ण कॅबिन आपल्या कवेत घेतली. धु धु करत संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली. ट्रकच्या कॅबिनला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. आणि तात्काळ तो ट्रक मधून बाहेर पडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ट्रकने पेट घेताच मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांमध्ये व गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या डिझेल टॅंक या पूर्ण भरलेल्या असतात. त्यामुळे डिझेल टॅंकचा भडका उडून मोठी हानी होण्याची संभावना नाकारता येत नाही. परंतु सुदैवाने अशी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पूर्ण कॅबिन जळून खाक झाल्यानंतर आग आटोक्यात आली.
No comments: