प्रशांत चंदनखेडे वणी
देहविक्री करणाऱ्या दोन महिलांमध्ये ग्राहकांवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या दोन महिलांमध्ये वाद सुरु असतांना एका महिलेसोबत असलेल्या इसमाने दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर खुर्ची मारून जखमी केल्याची घटना प्रेमनगर परिसरात घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी महिलेसह तिच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.
शहरालगत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती आहे. येथे वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेल्या महिला देहविक्रीचा व्यवसाय करतात. प्रेमनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीतील देहविक्री करणाऱ्या महिला ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करतात. ग्राहकांना भुरळ घालण्याची या महिलांमध्ये चढाओढ सुरु असते. अशातच देहविक्री करणाऱ्या एका महिलेचे ग्राहक दुसऱ्या महिलेकडे गेल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात देहविक्री करणाऱ्या एका महिलेसोबत असलेल्या इसमाने दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर खुर्ची मारल्याने ती जखमी झाली आहे.
वेश्या व्यवसायातही स्पर्धा सुरु झाल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. प्रेमनगर वस्तीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पिंकी नामक महिलेचा (काल्पनिक नाव) राजेश्वरी नामक महिलेशी ग्राहक खेचण्यावरून वाद झाला. पिंकीचे ग्राहक राजेश्वरी आपल्याकडे ओढत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला वाद नंतर चांगलाच विकोपाला गेला.
पिंकी राजेश्वरीच्या घरासमोर येऊन तिला शिवीगाळ करू लागली. तू माझ्या ग्राहकांना आपल्याकडे का बोलावतेस असे म्हणत पिंकी राजेश्वरीला शिवीगाळ करीत असतांना तिच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमाने बाजूला ठेऊन असलेली खुर्ची राजेश्वरीच्या डोक्यावर मारली. त्यामुळे राजेश्वरी जखमी झाली. तसेच त्या इसमाने राजेश्वरीला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. त्यामुळे झालेली मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राजेश्वरीने पोलिस स्टेशनला नोंदविली. तिच्या तक्रारी वरून पोलिसांनी पिंकी व तिच्या सोबत असलेला अनोळखी इसम या दोन्ही आरोपींवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: