प्रशांत चंदनखेडे वणी
भाजपच्या संकल्प से सिद्धीतक या अभियानाचा समारोप वणी येथे झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता गाजविणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमात पक्ष प्रवेश व पक्षांतर्गत पदांवर नियुक्तीही करण्यात आली.
या समारोप समारंभाला ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी महामंत्री रवी बेलुरकर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर, वणी तालुका अध्यक्ष प्रदिप जेऊरकर, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला पावडे, वणी तालुका अध्यक्षा मिरा पोतराजे, जयमाला दर्वे, उमा पिदुरकर, संध्या अवताडे, मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, झरी तालुका अध्यक्ष नागेश घुगुल, प्रा.महादेव खाडे, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विलास डवरे यांनी पक्ष प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतांना म्हटले की, आम्ही मागेल त्याला घरकुल दिले. विशेष म्हणजे अतिक्रमण धारकांनाही घरकुल, वीज, रस्ते या सुविधा उपलब्ध करून दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळाचे पाणी पोहचविले. लाडकी बहीण व इतरही लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून जनता आमच्या पाठीशी आहे. आम्ही जो शब्द दिला तो पाळला. त्यामुळे जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेचा आम्हाला पूर्ण प्रतिसाद मिळेल, यात दुमत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकहाती सत्ता आणू. हा आशावादही ऍड. प्रफुल चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments: