Latest News

Latest News
Loading...

वांजरी गावाजवळ असलेल्या लाइमस्टोन खदानीने गावकरी त्रस्त, खदानीच्या नियमबाह्य कामांना चाप लावण्याची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील वांजरी गावाजवळ लाइमस्टोनची खदान असून या खदानीतून मोठ्या प्रमाणात लाइमस्टोनची अवजड वाहतूक सुरु असते. तसेच वेळेचे भान न ठेवता रात्री बेरात्री या खदानीत ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून खदान मालकाविरुद्ध येथील नागरिकांमधून कमालीचा असंतोष खदखदत आहे. नियमांना धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने या गिट्टीखाणीत काम सुरु असून याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वांजरी ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश काकडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वांजरी गावाजवळ लाइमस्टोनची मोठी खदान आहे. या खदानीतून दिवसरात्र लाइमस्टोनची वाहतूक सुरु असते. ट्रकांमध्ये पासिंग क्षमतेपेक्षा जास्त लाइमस्टोन भरला जातो. लाइमस्टोनच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत. ट्रकांमधून ओवहरलोड लाइमस्टोनची वाहतूक केली जात असल्याने लाइमस्टोनचे मोठमोठे दगड रस्त्यावर पडून छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत. ट्रकांमधून लाइमस्टोनचे दगड पडून रस्त्याने मार्गक्रमण करणारे नागरिक जखमी देखील झाले आहेत. लाइमस्टोनचे उत्खनन व वाहतुकीमुळे प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. याच लाइमस्टोन खदानीत साचलेल्या पाण्यात बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही येथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. 

खदान मालकाच्या बेजबाबदारपणाने कळस गाठला आहे. लाइमस्टोनचे मोठमोठे दगड फोडण्याकरिता व भूगर्भातून दगड बाहेर काढण्याकरिता रात्री बेरात्री ब्लास्टिंग करण्यात येते. त्यामुळे येथील नागरिकांची झोपमोड होत आहे. या खदानीत नियमबाह्य पद्धतीने कामे सुरु असून याची चौकशी करून संबंधित खदान मालकावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वांजरी ग्रा.प. सदस्य आकाश काकडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 



No comments:

Powered by Blogger.