रहदारी व वाहतुकीची धुरा वाहणाऱ्या रस्त्याची झाली अतिशय दयनीय अवस्था, जागोजागी फाटलेल्या रस्त्याला लावली जात आहे ठिगळं
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील रंगनाथ स्वामी मंदिरापासून तर लालगुडा चौपाटीकडे जाणारा प्रमुख रहदारीचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. हा रस्ता पूर्णतः खड्ड्यांनी व्यापला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्ताच खड्ड्यात गेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्याची अत्यंत गंभीर अवस्था झालेली असतांना या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी केवळ थातुर मातुर डागडुजी करण्यात आली आहे. काही मोठ्या खड्ड्यांमध्ये मुरूम गिट्टी भरून फाटलेल्या रस्त्याला ठिगळं लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र पूर्ण रस्ताच फाटलेला असतांना ठिगळं कुठे कुठे लावणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काही मोजके खड्डे मुरूम गिट्टीने बुजविण्यात तर आले. पण पावसाने अल्पावधीतच हे खड्डे उघडे पडणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रस्त्याची करण्यात आलेली ही तात्पुरती डागडुजी पावसाळ्यात टिकाव धरेल काय, हा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यांची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. या रस्त्यांनी मार्गक्रमण करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. या रस्त्यांनी वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून मोटारसायकल चालविणे तर अतिशय कठीण झाले आहे. खड्डे चुकवितांना संतुलन बिघडून मोटारसायकल चालकांचे छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. रंगनाथ स्वामी मंदिरापासून तर दर्ग्या पर्यंतचा रस्ता अपघाताला आमंत्रण देऊ लागला आहे. या रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की रस्ताच खड्ड्यात गेला हेच कळेनासे झाले आहे.
पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे तुडुंब भरले असून रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हा रस्ता पूर्णतः जलमय झाला आहे. या प्रमुख रहदारीच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वाहनांची वर्दळ व रहदारीने नेहमी गजबजलेला असणारा हा रस्ता आता आपल्या नशिबाला कोसतो आहे. वाहतूक व रहदारीची धुरा वाहणारा हा रस्ता खड्ड्यांच्या झालेल्या जखमांनी विव्हळतो आहे. खड्ड्यांच्या जखमांवर डांबर किंवा सिमेंट काँक्रीटचा लेप लावण्याची हा रस्ता वाट बघतो आहे. पण या रस्त्याच्या वेदनांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अनेक रहिवाशी वस्त्यांना या रस्त्याने मोठा आधार दिला आहे. वागदरा, लालगुडा व घुग्गुस मार्गावर जाण्याकरिता हा रस्ता महत्वाची भूमिका बजावत असतांनाही या प्रमुख रस्त्याच्या नशिबी नेहमीच दुरावस्था आली आहे.
रंगनाथ स्वामी मंदिर ते दर्ग्या पर्यंत या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याने जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. खान बाधित क्षेत्रातील रस्त्यांपेक्षाही वाईट अवस्था या रस्त्याची झाली आहे. शहरातील गल्लीबोळात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनले. पण प्रमुख रहदारीचा हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे की दुजाभाव, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना कमालीचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्याने प्रवासी वाहने व ऑटो चालवितांना तर तारेवरची कसरत करावी लागते. रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणल्यानंतरही नेमका याच रस्त्याच्या बांधकामासाठी निधी कमी पडला की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. रस्ते विकास व सौंदर्यीकरणाच्या बोंबा मारणाऱ्यांच्या डोळ्यात हा कुरुपलेला रस्ता झणझणीत अंजन घालणारा आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हवालदिल झालेल्या नागरिकांमधून होऊ लागली आहे.
No comments: