शहरात मूलभूत सोइ सुविधांचा अभाव, प्रमुख चौकांमध्ये महिलांसाठी प्रसाधन गृहच नाही, महिलांनी पालिका प्रशासनाचे उघडले डोळे
प्रशांत चंदनखेडे वणी
खनिज संपंन्न, आर्थिक प्रगत, सहकार उन्नत व सांस्कृतिक वारसा लाभलेला तालुका म्हणून वणी तालुक्याला ओळखलं जातं. वणी येथे मोठी व्यावसायिक बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागांसह आसपासच्या तालुक्यातीलही नागरिक येथे खरेदीसाठी येतात. मात्र मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या शहराला नगर पालिकेच्या दुर्लक्षित धोरणांचा फटका बसला आहे. नगर पालिकेच्या उदासीनतेमुळे शहराच्या विकासाची गती खुंटली आहे. शहरवासी मूलभूत सोइ सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. शहरवासीयांना सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगर पालिका कधी उत्साहीच राहिली नसल्याचे दिसून येते. सरकारच्या स्मार्ट सिटी धोरणाला वणी शहर हे पूर्णतः अपवाद ठरले आहे. नगर पालिकेचा निरूत्साहीपणा शहराच्या विकासाला नडला आहे. शहरात आजही महिलांसाठी प्रसाधन गृहांची कमतरता दिसून येते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये महिलांसाठी प्रसाधन गृहांची व्यवस्थाच नसल्याने नगर पालिकेविषयी महिलांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. नगर पालिकेला मूलभूत सोइ सुविधांचाही विसर पडल्याने शहरातील जागृत महिलांनी पालिका प्रशासनाला त्याची जाणीव करून दिली. महिलांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक व साई मंदिर चौक परिसरात महिलांसाठी प्रसाधन गृहच नसल्याने महिलांनी ही समस्या नगर पालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोर आणून दिली आहे. शहरात केवळ विकासकामे केल्याचा ढोल पिटला जात आहे. पण शहरवासी आजही मूलभूत सोइ सुविधांपासून वंचित आहेत. शहरातील सार्वजनिक प्रसाधन गृहांची अतिशय वाईट अवस्था झाली असून प्रमुख चौकांमध्ये तर प्रसाधन गृहेच नाहीत. ८० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात सोइ सुविधांचा असलेला अभाव हे शहरवासीयांचं मोठं दुर्भाग्य आहे. एक मोठी व्यावसायिक बाजारपेठ असलेलं हे शहर नगर पालिकेच्या अनास्थेमुळे मूलभूत सोइ सुविधांनाही मुकलं आहे. वणी तालुक्यातील ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातीलही नागरिक शहरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. मात्र शहरातील सोइ सुविधांचा अभाव पाहून त्यांचा मोठा मनःस्ताप होतांना दिसतो.
नगर पालिका जेवढ्या ऊर्जेने कर वसुली करते तेवढ्या ऊर्जेने विकासकामे मात्र करतांना दिसत नाही. आजही शहरातील काही भाग विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यांच्या पर्यंत अजूनही मूलभूत सोइ सुविधा पोहचल्या नाहीत. नगर पालिकेचे विकासाचे धोरण हे शहरव्यापी नसल्याने विकासाची गंगा कोणत्या दिशेने वाहते हेच कळायला मार्ग नाही. नगर पालिकेचा कागदोपत्री विकास आराखडा अजूनही काही भागात प्रत्येक्षात उतरला नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. विकास कामांमध्ये भागीदारीच मोठी राहिल्याने विकासकामांच्या दर्जाविषयी देखील अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. किंबहुना शहरवासीयांना मूलभूत सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याचं सौजन्यही दाखविण्यात आलं नाही. नगर पालिकेला सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याचे वाभाडे राहिल्याने महिलाशक्ती आता एकवटली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये महिलांसाठी प्रसाधन गृहांची व्यवस्था करून देण्याची मागणी शहरातील जागृत महिलांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी पंचायत समितीच्या माजी उपसभापती वृषाली खानझोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनावर पूजा पानघाटे, शिला मेश्राम, पुष्पाताई आत्राम, ईशा ठाकुरवार, मंदा सोनारखन, सुवर्णा चतुर, उज्वला कोवे, ललिता खैरे, कांचन सिडाम, पौर्णिमा तूराणकर आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतांना मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
No comments: