Latest News

Latest News
Loading...

चोरट्यांनी वेकोलिच्या भालर वसाहतीतील क्वार्टर फोडले, २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल केला लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या भालर वसाहतीतील वेकोलि कर्मचाऱ्याचे बंद क्वार्टर फोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना १० जुलै रात्री ११.४५ वाजता ते ११ जुलै सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भालर वसाहतीतील क्वार्टर नंबर एम क्यू २७५ मध्ये ध्रुवदेव संपत राजभर (५३) हे राहतात. ते मूळचे हरिदासपूर जि. गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवाशी असून ते वेकोलिच्या निलजई ०१ कोळसाखाणीत डंपर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. ते जवळपास १५ वर्षांपासून भालर वसाहतीतील क्वार्टरमध्ये राहतात. त्यांची पत्नी व मुलगा काही कामानिमित्त त्यांच्या मूळगावी गेल्याने ते सध्या एकटेच क्वार्टरमध्ये राहत आहेत. त्यांची कोळसाखाणीत रात्रपाळीची शिफ्ट सुरु असल्याने ते १० जुलैला रात्री ११.४५ वाजता क्वार्टरला कुलूप लावून कर्तव्यावर गेले होते. ते सकाळी कर्तव्यावरून परत आल्यानंतर त्यांना क्वार्टरचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला. घरातील सामानही अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच घरातील कपाटाचे दारही उघडे दिसले. त्यामुळे त्यांना क्वार्टरमध्ये चोरी झाल्याचे कळून चुकले. 

चोरट्यांनी क्वार्टर कुलूपबंद असल्याची संधी साधून चोरीचा डाव साधला. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी कपाटात ठेऊन असलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात साफ केला. चोरट्यांनी कपाटातील १० ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ८० हजार रुपये, २ ग्रामचे कानातील सोन्याचे डूल किंमत १६ हजार रुपये, ८ ग्राम वजनाचा सोन्याचा हार किंमत ६४ हजार रुपये, ६ ग्राम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या किंमत ४८ हजार रुपये, २० ग्राम वजनाची चांदीची चैन किंमत २ हजार रुपये व रोख २० हजार रुपये असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ध्रुवदेव राजभर हे रात्री कर्तव्यावर गेल्यानंतर चोरट्यांनी चोरीचा डाव साधून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या टाक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर ३०५(a), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे

No comments:

Powered by Blogger.