प्रशांत चंदनखेडे वणी
दुचाकी चालक मोबाईलवर बोलत असतांना मागून दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वाराचा क्षणात मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना ११ जुलैला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शहरातील शिवाजी पार्क जवळ घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील महादेव नगरी येथे वास्तव्यास असलेले विकास पुरुषोत्तम ढेंगळे (४२) हे नटराज मार्केटिंग येथे बिल्डर सुपरवाईजर म्हणून काम करतात. ते आपली कामे आटपून शिवाजी पार्क जवळून मोटारसायकलने जात असतांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल हळू केली. त्यानंतर ते मोबाईलवर आलेला फोन उचलून मोबाईलवर बोलत असतांनाच मागून भरधाव आलेल्या मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या कानाला लागलेला मोबाईल हिसकावून सुसाट पळ काढला. मोटारसायकलवर तीन जण बसले होते. त्यापैकी मधात बसलेल्या चोरट्याने विकास ढेंगळे यांचा मोबाईल हिसकावला आणि भरवेगात ते दुचाकीने पळाले. विकास ढेंगळे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांच्या धूम स्टाईल दुचाकी चालविण्यापुढे त्यांचा वेग कमी पडला.
चोरटे सिनेस्टाइल चोरीचे कर्तब दाखवू लागल्याने नागरिकांमध्ये आता आपल्या किंमती वस्तूंविषयी चिंता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच दुचाकीस्वार चोरट्यांनी नागरिकांना ठगवुन त्यांच्या जवळील रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. चोरटे विविध शक्कली लढवून चोरीचे डाव साधत आहेत. मोबाईल हिसकावून पळ काढणारे दुचाकीस्वार चोरटे हे २० ते २५ वर्षे वयोगटातील असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यांचा विवो कंपनीचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याने त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. विकास ढेंगळे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर बीएनएसच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: