प्रशांत चंदनखेडे वणी
विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही करून रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही १३ जुलैला पहाटे २.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या एपीआय अश्विनी रायबोले या पोलिस पथकासह पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना त्यांना पहाटे २.४० वाजताच्या सुमारास जन्नत सेलिब्रेशन हॉल समोरून एक ट्रॅक्टर जातांना दिसला. त्यांनी त्या ट्रॅक्टरला थांबवून ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती भरून असल्याचे आढळून आले. त्यांनी ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर मधून चोरीची रेती वाहून नेत असल्याचा संशय बळावल्याने एपीआय अश्विनी रायबोले यांनी रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस स्टेशला लावला. या कारवाईत पोलिसांनी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर किंमत ३ लाख रुपये व एक ब्रास रेती किंमत ६ हजार रुपये असा एकूण ३ लाख ६ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एपीआय अश्विनी रायबोले यांच्या तक्रारी वरून विशाल अशोक वैद्य (३४) रा. वागदरा ता. वणी या रेती चोरट्यावर बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: