प्रशांत चंदनखेडे वणी
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजलं. विरोधकांनी आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले. काही मुद्द्यांवारून सरकारची कोंडी केली. तर काही मुद्द्यांवर सरकारला घेरले. राज्यातील विविध प्रश्न उपस्थित करून सरकारला उत्तरे देण्यास भाग पाडले. अनेक समस्या विधिमंडळात प्रखरतेने मांडण्यात आल्या. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी देखील आपल्या मतदार संघातील समस्या प्रखरपणे मांडल्या. जनतेशी संबंधित अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात ठामपणे मांडले. वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न व समस्या सभागृहात रीतसरपणे मांडून त्यावर आकलन करण्याची त्यांनी विनंती केली. वणी विधानसभा मतदार संघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनात वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या बेधडकपणे मांडणारे संजय देरकर हे जनतेचा विश्वास सार्थक ठरविणारे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वणी मतदार संघातील अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. त्याचे विवरण पुढील प्रमाणे आहे.
खनिज विकास निधीचा पारदर्शकपणे वापर व्हावा
यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे खनिज विकास निधीचा वाटप करतांना त्याची योग्यरीत्या पडताळणी होतांना दिसत नाही. खनिज विकास निधी कोणतीही तपासणी न करता वाटप केला जात आहे. अभ्यासिकांचे साहित्य खरेदी करतांना ग्रामपंचायत स्तरावर जागा उपलब्ध आहे किंवा नाही, याची पाहणी व पूर्व पडताळणी न करता मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतांनाच त्यांनी तशी मागणी देखील या माध्यमातून केली आहे.
मारेगाव व झरी तालुक्यातील क्रीडा संकुलाचे रखडलेले काम सुरु करावे
मारेगाव व झरी येथे पाच एकर जागेवर क्रीडा संकुल उभारणीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही अजून प्रत्येक्षात मात्र काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिस भरती, सैन्य भरती तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता क्रीडा संकुलाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे.
नगरपंचायतींमध्ये मनुष्यबळाचा अभाव
झरी जामणी व मारेगाव येथे नगरपंचायती अस्तित्वात आल्या असल्या तरी या नागरपंचायतींमध्ये मनुष्यबळाचा प्रचंड अभाव आहे. सध्या एका अधिकाऱ्याकडे दोन्ही नगरपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामकाजाचा प्रचंड व्याप येत आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक त्या सेवा मिळत नसून नागरिकांची कामे होण्यास प्रचंड दिरंगाई होत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी.
पाणी टंचाई व ड्रेनेजची समस्या
झरी व मारेगाव शहरांमध्ये तीव्र पाणी टंचाई व निकृष्ट ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा व गटार व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी खास पावले उचलण्याची आवशयकता आहे. याकडे लक्ष देण्यात यावे.
दिव्यांग मुलांसाठी 5% निधीचा अभाव
दिव्यांग बालकांना मिळणारा 5% हक्काचा निधी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिकेकडून गेल्या 6 वर्षांपासून वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बालक आणि त्यांचे कुटुंबीय हक्काच्या निधी पासून वंचित राहिले आहेत. तेंव्हा दिव्यांग बालकांवर होणारा हा अन्याय तात्काळ दूर होईल अशी उपाययोजना करावी.
वणी रेल्वे सायडिंग जवळील रस्त्यांची दयनीय अवस्था
वणी येथील रेल्वे सायडिंग जवळ व चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पांदण रस्त्यांपेक्षाही गंभीर अवस्था या रस्त्यांची झाली आहे. उड्डाणपुलांच्या सुरु असलेल्या बांधकामामुळे त्यासभोवतीचे पासिंग रस्ते अतिशय खराब झाले असून या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
No comments: